मुंबई : आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या मोसमाची सलामीची लढत अगदी काही तासांवर येऊन ठेपली असताना मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील (Wankhede Stadium Mumbai) कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या आठवड्यातच 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्टेडियमधील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासलं असल्याचं कळतंय. त्यामुळे मुंबईतील वानखेडे मैदानावर आयपीएलचे सामने खेळणं कितपत सुरक्षित आहेत, असा मुद्दा उपस्थित होत आहे. (IPL 2021 Wankhede Stadium 3 Groundmen tested Corona Positive)
वानखेडे स्टेडियमवर पुन्हा काही कर्मचार्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. ताज्या माहितीनुसार, वानखेडेमध्ये आणखी 3 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी दोन ग्राऊंड्समन आणि एका प्लंबरचा समावेश आहे. वानखेडे स्टेडियमवरील कोरोना संसर्गाची ही पहिलीच घटना नाही. गेल्या आठवड्यात, याच स्टेडियमचे 08 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, सोमवारी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होतोय. त्यामुळे राज्यात आयपीएलच्या आयोजनावर संकट निर्माण झालंय. मुंबईत उपस्थित काही खेळाडूंव्यतिरिक्त, ग्राउंड्समन ते टूर्नामेंट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सपर्यंतच्या काही कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा परिस्थितीत नवीन कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा बीसीसीआयची चिंता वाढविली आहे.
स्टेडियममध्ये तीन नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितलं की, “तपासणीत दोन कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्यामधले दोन मैदानातील कर्मचारी आहेत. दुसरीकडे एमसीए किंवा बीसीसीआयकडून या संदर्भात अजून कोणतीही माहिती किंवा कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
मुंबईतील वानखेडे मैदानावर 10 एप्रिल रोजी पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ही लढत खेळवण्यात येणार आहे. आयपीएलचा रणसंग्राम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. वानखेडे स्टेडियमवरही आयपीएलच्या काही सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. 10 ते 25 एप्रिलपर्यंतच्या जवळपास 10 मॅचेस वानखेडे मैदानावर होणार आहे.
मुंबईतील नियोजित सामने वानखेडे मैदानावरच पार पडतील, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट करत नाहक चर्चेतील हवा काढून घेतली आहे. बायो बबलमध्ये खेळाडूंवर कोणताही परिणाम होत नाही. अशा वातावरणात खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे मुंबईत सामने खेळविण्यास तूर्तास तरी कोणताही धोका नाही, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे. (IPL 2021 Corona Virus Patient Wankhede Stadium)
हे ही वाचा :
IPL 2021 : ‘बापसे बेटी सवाई!’, बटलरच्या लेकीचा हृदयस्पर्शी Video
IPL 2021 : कोहलीला ‘विराट’ रेकॉर्ड करण्याची संधी, असा कारनामा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनू शकतो!