मुंबई – शाहरुखच्या कोलकाता नाईट राईडर्स संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सनं कोलकात्याचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबचा 7 धावांनी विजय झाला. पहिल्या पराभवानंतर आता कोलकाता नाईट राईडर्सचं टेन्शन काही केल्या कमी होत नाही. अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने आयपीएल 2023 स्पर्धेतून माघार घेतली होती. शाकिबला बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून आयपीएल खेळण्यासाठी एनओसी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. आता लिटन दासबाबतही असंच काहीसं झाल्याने कोलकात्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
लिटन दाससाठीही कोलकाता नाईट राईडर्सला काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. लिटन दासलाही बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एनओसी दिलेली नाही. मीरपूरमध्ये आयर्लंड विरुद्ध एक कसोटी सामना खेळणं बाकी आहे. हा सामना 8 एप्रिलला संपणार आहे. त्यानंतर 9 एप्रिलला तो कोलकात्यात येईल. मात्र त्यानंतरही त्याला परत मायदेशी जावं लागणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, लिटन दास 14 एप्रिलला हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळेल. त्यानंतर 29 एप्रिलला पुन्हा मायदेशी परतेल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याला 9 मेला सुरु होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी बोलवलं आहे. बांगलादेश मालिकेपूर्वी आयर्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. कोलकाता नाईट राईडर्सने शाकिबला आपल्या संघात 1.5 कोटी खर्च करून घेतलं होतं. तर लिटन दासला 50 लाखांच्या बेस प्राईसवर संघात सहभागी केलं होतं.
कोलकाता नाइट राइडर्स सर्वोत्तम Playing XI: सुनील नरेन, वेंकटेश अय्यर,नीतीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, नारायण जगदीशन, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी.
कोलकात्याचा पूर्ण स्क्वॉड : नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, डेविड वीजा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, लॉकी फर्गयूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिट्टन दास, मनदीप सिंह आणि शाकिब अल हसन.