मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला असून 13 फेऱ्या होणं बाकी आहे. त्यामुळे पहिल्या फेरीतच भवितव्य सांगणं कठीण आहे. असं असलं तरी पहिल्याच सामन्यात काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने आक्रमक खेळी करत संघाला तारलं. संघाची बिकट अवस्था असताना तिलक वर्माने चांगली कामगिरी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सनं गमवला. पण सन्मानजनक धावा उभारण्यात तिलक वर्माचा हातभार लागला. तिलक वर्माने 46 चेंडूत 84 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईला 7 गडी गमवून 171 धावा करता आल्या. यानंतर तिलक वर्माच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
“मी कायम उशिरापर्यंत काम करायचो. कारण मुलाचं स्वप्न पूर्ण व्हायला हवं. मी त्याला त्याची आवडती बॅट घेता यावी यासाठी दिवसभर ओव्हरटाईम केलं. मला आठवते एकदा त्याने बॅट खरेदीसाठी 5000 रुपये मागितले होते. इतकी रक्कम माझ्यासाठी खूप मोठी होती. मी त्याला 1000 रुपयांपर्यंत घ्यायला सांगितलं. तिलकने कायम तडजोड केली पण कधीच तक्रार केली नाही.”, असं तिलक वर्माचे वडील नंबूरी नागराजू यांनी सांगितलं.
तिलक वर्मा याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या हर्षल पटेलला शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. हा षटकार साधासुधा नव्हता तर धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट्स होता. हर्षल पटेलनं टाकलेल्या 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.
20 वर्षीय तिलकने आयपीएलमध्ये 2022 पासून आतापर्यंत 15 सामने खेळला आहे. त्यात 43.72 च्या सरासरीने आणि 137.82 च्या स्ट्राईक रेटने 481 धावा केल्या. या लीगमध्ये आतापर्यंत 38 चौकार आणि 20 षटकार ठोकले आहे. मागच्या सिझनमध्ये 36.09 सरासरी आणि 131.02 च्या स्ट्राईक रेटने 397 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सने तिलक वर्माला मेगा लिलावात 1.70 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
20 वर्षीय तिलकने वर्ष 2018-19 या काळात रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यू केलं होतं. याच वर्षी हैदराबादकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळला होता. हैदराबादचा तिलक वर्मा वर्ष 2020 मध्ये भारताच्या अंडर 19 वर्ल्डकपसाठी खेळला आहे. त्याने सहा सामन्यातील तीन डावात 86 धावा केल्या होत्या.
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.