मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुपी राक्षसाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसत आहे. आता आयपीएल 2023 स्पर्धेवरही कोरोनाचं संकट घोंगावत आहे. त्यामुळे आयपीएल 2021 प्रमाणे पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धा स्थगित करावी लागते की काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. आता माजी खेळाडू, क्रिकेट समालोचक आणि तज्ज्ञ असलेल्या आकाश चोप्राला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: आकाश चोप्रा याने दिली आहे. युट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी पोस्टवर त्याने याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळे काही दिवस आकाश चोप्रा समालोचन करताना दिसणार नाही.
“कॉट अँड बोल्ड कोविड.. हा…सी (कोविड) व्हायरसने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. खूपच साधारण लक्षणं आहे. सर्वकाही नियंत्रणात आहे. काही दिवसांसाठी समालोचनापासून दूर असेन. उत्साहपूर्वक पुनरागमनाची आशा”, असं ट्वीट आकाश चोप्रा याने केलं आहे.
Caught and Bowled Covid. Yups…the C Virus has struck again. Really mild symptoms…all under control. ?
Will be away from the commentary duties for a few days…hoping to come back stronger ? #TataIPL— Aakash Chopra (@cricketaakash) April 4, 2023
आकाश चोप्राने ऑक्टोबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. शेवटचा सामना ऑक्टोबर 2004 मध्ये खेळला होता. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आकाशने एकूण 10 कसोटी सामने खेळला आहे. यात फलंदाजी करताना 23 च्या सरासरीने 437 धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएल 2021 दरम्यान काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लीग मध्येच स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित सामने युएईत खेळवण्यात आले होते. आयपीएल 2023 स्पर्धा आता सुरु असून आतापर्यंत फक्त 6 सामने खेळवले गेले आहेत. कोरोनाचा तसा प्रसार नसल्याने बायोबबल नावाचा प्रकारही नाही. त्यामुळे कोरोनाचं संकट वाढलं तर मात्र चिंता वाढू शकते.
आयपीएल 2023 स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला आहे. सध्या साखळी फेरीचे सामना सुरु असून 21 मे पर्यंत एकूण 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफ आणि अंतिम फेरीचा सामना असेल. प्लेऑफ आणि अंतिम फेरीबाबत अजूनही बीसीसीआयने कोणतीच घोषणा केलेली नाही.
मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट राईडर्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनराईजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स
आयपीएल 2023 स्पर्धेतील आज सातवा सामना खेळला जाणार आहे. यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात लढत असणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये 7.30 वाजता खेळला जाणार आहे. दिल्लीनं या स्पर्धेतील पहिला सामना गमवला आहे. तर गुजरातनं स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे.