मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं 8 गडी गमवून 157 धावा केल्या. चेन्नईला विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे. वानखेडेच्या मैदानावर ही धावसंख्या सहज गाठणं सोपं आहे. त्यामुळे आता मुंबईच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. दुसरीकडे अर्जुन तेंडुलकराला संधी दिली जाते का नाही ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी सलामीला आली. पहिल्याच षटकात दोन चौकार मारत रोहित शर्माने आपला आक्रमक अंदाज दाखवला. रोहित शर्माचं वादळ घोंगावण्यापूर्वी तुषार देशपांडेनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 13 चेंडूत 21 धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. पण इशान किशनला रवींद्र जडेजाने रोखलं आणि ड्वेन प्रेटोरियसनं इशान किशान त्याचा झेल घेतला. त्याने 21 चेंडूत 31 धावांची खेळी केली.
सूर्यकुमार यादव मैदानात आला पण हजेरी लावून पुन्हा निघून गेला. त्याला या सामन्यातही सूर गवसला नाही. 2 चेंडूत अवघी 1 धाव करून बाद झाला. पंचांनी त्याला नाबाद दिलं होतं. पण मैदानात धोनी असेल तर डीआरएसचं काय सांगता येत नाही. पंचांचा निर्णयानंतर लगेचच धोनीने रिव्ह्यू घेतला. मग काय पंचांचा निर्णय चुकीचा ठरला आणि सूर्यकुमार यादव बाद झाला. डीआरएस म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टम याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
सूर्यकुमार यादव तंबूत पोहोचत नाही तोच कॅमरून ग्रीन बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेलं घेतला. चेंडू इतक्या वेगाने होता की पंचही मैदानावर झोपलं. पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोच झेल जडेजाच्या हातात होता. अर्शद खानही चांगली कामगिरी करू शकला नाही. मिशेल सॅटनरच्या गोलंदाजीवर अर्शद खान एलबीडब्ल्यू झाला.
तिलक वर्माही काही खास करू शकला नाही. त्याच्या रुपाने सहावा गडी बाद झाला आणि डीआरएसही वाया गेला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 18 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्या.
ट्रिस्टन स्टब्सकडून मुंबईला खूपच अपेक्षा होत्या. पण उंच फटका मारल्यानंतर त्याचा अप्रतिम झेलं सीमारेषेवर घेण्यात आला. ड्वेन प्रेटोरियसनं अप्रतिमरित्या चेंडू अडवला आणि सीमारेषेबाहेर जाण्यापूर्वी आत फेकला. मग काय संधीचं सोनं करत ऋतुराज गायकवाडनं त्याचा झेल घेतला.
स्टब्स 10 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर टीम डेविडने चांगली फटकेबाजी केली. त्याने 22 चेंडूत 31 धावा केल्या. तुषार देशपांडेने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. सीमारेषेवर अजिंक्य रहाणेने त्याचा झेल घेतला.