मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर ठेपली आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोण खेळणार कोण नाही? याची चर्चा रंगली आहे. भारतीय यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या 16 व्या पर्वात खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपघातामुळे गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत मैदानापासून दूर आहे. त्यामुळे या पर्वात ऋषभ पंत खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सची धुरा डेविड वॉर्नरच्या खांद्यावर देण्यात आली आहे. असं असताना प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या वक्तव्याने सर्वांची मनं जिंकून घेतलं आहेत.
दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी सांगितलं की, पंत संघाचा नायक आहे. त्याच्यासाठी फ्रेंचाइसीने खास योजना तयार केली आहे. पंत प्रत्येक सामन्यात डगआउटमध्ये माझ्यासोबत असेल. जर हे शक्य झालं नाही तर आम्ही इतर मार्गाने प्रयत्न करू. त्याचा नंबर मी कॅप आणि टीशर्टवर ठेवीन. कारण पंत आमच्या सोबत नसला तरी आमचा लीडर आहे.
पंतच्या गैरहजेरीत संघाकडून यष्टीरक्षकाची भूमिका कोण बजावेल? असा प्रश्न रिकी पाँटिंगला विचारला असता त्याने सांगितलं की, “आम्ही याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. सरफराज खान आमच्या संघात आहे. सराव सामन्यात शेवटचा निर्णय घेऊ. पण पंतची जागा भरणं कठीण आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा फायदा घेत आम्ही प्लेईंग 11 मध्ये बदल करू शकतो. ”
दिल्लीत नुकतंच संघाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलंय. फ्रेंचाईसीने ग्लोबल लॉजिस्टिकला आपलं प्रायोजक म्हणून निवडलं आहे. या जर्सीच्या अनावरणावेळी दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ धीरज मल्होत्रा आणि डीपी वर्ल्डचे सीईओ रिझवान सूमार उपस्थित होते. यावेळी पाँटिंगनं कर्णधार डेविड वॉर्नरचं कौतुक केलं.
आयपीएलच्या 15 व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी खर्च करून डेविड वॉर्नरला आपल्या संघात घेतलं. हैदराबाद सनराईजर्सने आयपीएलच्या 14 व्या पर्वानंतर त्याला रिलीज केलं होतं. मागच्या पर्वात वॉर्नरने 48 सरासरीने 432 धावा केल्या होत्या. यात पाच अर्धशतकी खेळी होत्या. आता वॉर्नरकडे दिल्लीचं कर्णधारपद असणार आहे. तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार आहे.
टीम दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमैन पॉवेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश धुळ, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.