IPL 2025 MS Dhoni : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 2025 ची दणक्यात सुरुवात झाली. त्याचवेळी कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना हवा देण्यात आली. आता धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या पुड्या पुन्हा सोडण्यात आला. आज चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यावेळी धोनी याने एक मोठी घोषणा केली आहे. त्याने चाहत्यांना मोठी आनंदवार्ता दिली. जोपर्यंत त्याची खेळण्याची इच्छा आहे, तो CSKसाठी खेळत राहील, अशी खुशखबर त्याने दिली.
काय म्हणाला धोनी?
जिओ हॉटस्टारवर धोनीने एक मुलाखत दिली. त्यावेळी, “माझी जोपर्यंत खेळण्याची इच्छा आहे, तोपर्यंत मी सीएसकेसाठी खेळत राहील. ही माझी फ्रेंचाईज आहे. जर मी व्हीलचेअरवर असेल तरी, ते मला ओढत नेतील.” असे धोनी म्हणाला. धोनी आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. त्याने आयपीएलच्या महाकुंभात पाच वेळा विजय मिळवून दिला आहे. धोनीच्या नेतृत्वात CSK ने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये त्याने हा विजय मिळवला. त्याने 2024 च्या हंगामापूर्वी कर्णधार पद सोडले. त्याने ऋतुराज गायकवाड़ याला कर्णधार केले.
धोनीची योजना काय?
CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने धोनीचे कौतुक केले. तो म्हणाला, ” 43 व्या वर्षी सुद्धा त्याचे योगदान अभूतपूर्व आहे. या आयपीएलसाठी धोनी अजून जबरदस्त खेळेल अशी आशा त्याने व्यक्त केली. आमच्या संघात अनेक नवीन खेळाडू दाखल झाले आहेत. कधी कधी मला कुशल चेंडूवर खेळण्यास अवघड जाते. पण धोनी लिलया असा चेंडू टोलवतो. ही गोष्ट आम्हा सर्वांना चांगलं खेळण्यासाठी प्रेरणा देते. 43 व्या वर्षी धोनी जो काही खेळतोय, ते थक्क करणारं आहे.”
चाहत्यांना आता या हंगामात सुद्धा सीएसकेने आयपीएलवर मोहर उमटावी अशी मागणी केली आहे. ऋतुराज गायकवाड या नेतृत्वात हा संघ ट्रॉफीवर नाव कोरणार का हा सवाल विचारला जात आहे. तर दुसरीकडे धोनी मैदानात असल्याने सीएसकेचे मनोबल उंचावलेले आहे.