मुंबई – आता पर्यंत आयपीएलचे (IPL 2022) सोळा सामने झाले आहेत. 26 मार्चला आयपीएलचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून आत्तापर्यंत टीआरपीमध्ये (TRP) 33 टक्क्यांनी घसरण झाली आहे. पूर्वी इंडियन प्रीमियर लीगची चाहते आतुरतेने वाट पाहत असायचे. स्टेडियम, टीव्ही, मोबाईल, सगळीकडे मॅच पाहण्याची उत्सुकता असायची. पण आयपीएलच्या 2022 मोसमात आतापर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे हा झटका चाहत्यांनीच दिला आहे. बीसीसीआय लवकरच 2023-27 सीझनपर्यंत आयपीएलचे मीडिया हक्क विकणार आहे. अशा स्थितीत बीसीसीआयसाठी हा मोठा धक्का असू शकतो.
बीएआरसीने 26 मार्च ते 1 एप्रिलपर्यंतची आकडेवारी सादर केली आहे. आयपीएल 2022 च्या मोसमात 8 सामने झाले. आकडेवारीत दिल्याप्रमाणे 8 सामन्यांमध्ये टीव्हीचे रेटिंग 2.52 आहे. मागील हंगामाशी तुलना केल्यास,आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंग 3.75 होते. अशा परिस्थितीत, यावेळी टीव्ही रेटिंगमध्ये 33% घट झाली आहे. यापूर्वी, 2020 सीझनच्या पहिल्या आठवड्यात, टीव्ही रेटिंग 3.85 होते. म्हणजेच सलग दुसऱ्यांदा मानांकनात घसरण झाली आहे.
केवळ टीआरपी नाही, तर चाहत्यांच्या संख्येत सुध्दा मोठी घट झाली आहे. पहिल्या आठवड्यात 14% कमी म्हणजेच 229.06 दशलक्ष चाहत्यांनी सामने पाहिले आहेत. तर गेल्या वर्षी 267.7 दशलक्ष चाहत्यांना आयपीएल सामन्यांना प्रवेश दिला होता. आयपीएल सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात टूर्नामेंट दाखवणारे चॅनल BARC च्या यादीमध्ये रेटिंगच्या बाबतीत नंबर-1 वर पोहोचते. यंदा मात्र तसं काही घडताना दिसत नाही. स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी वाहिनी सध्या नंबर-3 वर आहे.