इराणी ट्रॉफी स्पर्धेत रणजी स्पर्धेतील गतविजेता मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल रेस्ट ऑफ इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर सुरुवातील तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर हा निर्णय योग्य वाटला. पण कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. तसेच सरफराज खानने आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं. मुंबईने 6 गडी गमवून 450 पार धावा केल्या आहेत. या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणे कमनशिबी ठरला असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. अजिंक्य रहाणे कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. तसेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका आहे. असं असताना निवड समितीवर छाप पाडण्याची संधी अवघ्या तीन धावांनी हुकली आहे.
पहिल्या दिवशी अंजिंक्य रहाणेने नाबाद 86 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा त्याला फक्त 11 धावा करता आल्या आणि 97 धावांवर बाद होत तंबूत परतावं लागलं. यश दयालच्या गोलंदाजीवर ध्रुव जुरेलने त्याचा विकेटमागे झेल पकडला. अजिंक्य रहाणेनं यावेळी 234 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचं शतक फक्त 3 धावांनी हुकलं.
दुसरीकडे, सरफराज खान जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. त्याने द्विशतकाकडे कूच केली आहे. त्यामुळे रेस्ट ऑफ इंडियाची चांगलीच अडचण झाली आहे. 450 हून अधिक धावांची आघाडी मोडून काढणं कठीण जाणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुंबईचा संघ पहिल्या डावात भक्कम स्थितीत आहे असं म्हणायला हरकत नाही.
मुंबई (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, एम जुनेद खान, मोहित अवस्थी.
रेस्ट ऑफ इंडिया (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुधरसन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.