CPL 2019 : भारतीय क्रिकेटर इरफान पठाण इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन प्रीमियर लीग T20 मध्ये (CPL 2019) इरफान पठाण खेळणार आहे. लिलावाच्या यादीत इरफान पठाणने नाव दिलं आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग येत्याचं आयोजन 4 सप्टेंबरपासून 12 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलं आहे. जर लिलावामध्ये इरफान पठाणला एखाद्या टीमने निवडलं तर विंडीजमधील प्रीमियर लीगमध्ये खेळणार इरफान पहिला भारतीय क्रिकेटर ठरेल. आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने परदेशी टी 20 लीगमध्ये सहभाग घेतलेला नाही. या लीगमध्ये 20 देशांतील तब्बल 536 खेळाडूंची नावं आहेत.
भारताकडून इरफान पठाणने 29 कसोटी, 120 वन डे आणि 24 टी 20 सामने खेळले आहेत. इरफानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे एखादा संघ त्याच्यावर बोली लावू शकतो. सध्या इरफानला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सध्या जम्मू काश्मीर संघाकडून खेळत आहे. दरम्यान सीपीएलने आपल्या वेबसाईटवर म्हटलंय, “इतक्या खेळाडूंची नाव या लीगमध्ये आल्याने, खरोखरच या लीगची उंची वाढली आहे. सर्वच खेळाडू कॅरिबेयन लीगमध्ये खेळू इच्छित आहेत. यंदा या स्पर्धेत आणखी काहीतरी चांगलं घडेल”
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये अलेक्स हेल्स, राशिद खान, शाकीब अल हसन, जोफ्रा आर्चर आणि जे पी डुमिनी यासारख्या खेळाडूंची नावं आहेत. याशिवाय कॅरेबियन खेळाडू आंद्रे रसेल, सुनील नरेन, शिमरॉन हेटमायर आणि शाय होप यासारखे खेळाडूही आहेत.
कॅरेबियन प्रीमियर लीगही भारतातील आयपीएलसारखीच आहे. इथे प्रत्येक फ्रँचायझीला 6 खेळाडू संघात कायम ठेवता येतात. विंडीजचे किमान तीन आणि जास्तीत जास्त 4 खेळाडू संघात हवेत.
कॅरेबियन प्रीमियर लीग 2018 मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या त्रिनबगो नाईट रायडर्सने जेतेपद पटकावलं होतं.