विकेटकीपर फलंदाज इशान किशन टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यापासून त्याला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे, टीममध्ये कमबॅकसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला बीसीसीआयने दिला होता. त्यामुळे इशान किशन गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. सध्या देशांतर्गत विजय हजारे स्पर्धा सुरु आहे. विजय हजारे स्पर्धा 50 षटकांची असून या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विचार केला जाण्याची शक्यता आहे. असं असताना टीम इंडियात कमबॅकसाठी आलेली संधी इशान किशन बरोबर हेरली आहे. झारखंडसाठी खेळताना आक्रमक खेळी करत त्याने शतक ठोकलं. इशान किशन या संघाचा कर्णधार आहे आणि आघाडीला फलंदाजी उतरतो. इशानने 78 चेंडूत 134 धावांची जबरदस्त खेळी केली. यात 16 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 171 पेक्षा जास्त आहे.
इशान किशनने शेवटचा वनडे सामना ऑक्टोबर 2023 मध्ये खेळला होता. हा सामना दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध होता. तेव्हापासून आतापर्यंत इशान किशनचा संघासाठी विचार केला गेलेला नाही. इतकंच काय तर त्याला सेंट्रल काँट्रॅक्ट लिस्टमधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. असं असताना इशान किशनने आपली चमक देशांतर्गत क्रिकेटमध्ये दाखवली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या नावाची चर्चा होईल हे मात्र तितकंच खरं. पण त्याची निवड होईल की नाही हे आता सांगणं कठीण आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जवळपास दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होणार आहे. तसेच भारताचे सामने दुबईत होणार आहेत. फेब्रुवारीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियाने अजूनही संघ जाहीर केलेला नाही. पण निवड समितीची काही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष आहे. इशान किशनने विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यात एक किंवा दोन मोठ्या खेळी खेळल्या तर त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. दरम्यान, आयपीएल 2025 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसणार आहे.