मुंबई : पाकिस्तानची (PAK) टीम दोनवेळा T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतून बाहेर पडली आहे. ऑस्ट्रेलियात (AUS) नुकत्याचं झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली खेळी केली नाही. त्यामुळे पाकिस्तान टीमचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. आशिया चषकात सुद्धा श्रीलंका टीमकडून पाकिस्तान टीमचा पराभव झाला. त्यावेळी सुद्धा चाहत्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टीममध्ये बदल करण्याच्या सुचना केल्या होत्या. विशेष म्हणजे ज्यावेळी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान टीमची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी सुद्धा निवड समितीवर टीका केली होती.
पाकिस्तान टीमचा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्यावेळी पराभव झाला, त्यावेळी पाकिस्तानच्या एका चाहत्याने ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्याने “एक नवाझ शरीफ फरार आणि एक शाहीन शाह आफ्रीदी फरारी, शाहीन तू अजून पाच बॉल टाकायला हवे होते, पण तू मैदानातून पळून गेलास. यापेक्षा मोठी घटना असूच शकत नाही. तुझा मृतदेह मैदानातून परत आला असता तर बरे झाले असते. जर तो मैदानात मेला असता तर त्याला शहीद म्हटले गेले असते, निदान फरारी नाही.” लिहिलं आहे.
ज्यावेळी वसिम अक्रम टिव्ही शोच्या कार्यक्रमात बोलत होता, त्यावेळी त्याने हे ट्विट वाचलं आणि चाहत्यावर जाम भडकला. ट्विटर युजरचं नावं साबित रहमान सत्ती आहे. त्याचं नाव घेऊन आक्रमने त्याला चांगलचं सुनावलं. “तुला लोकांशी कसं बोलायचं याचं भान नाही. मला या गोष्टीचा प्रचंड राग आला आहे. नशीब तु माझ्या समोर नाहीस” असं आक्रम म्हणाला.