जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं

| Updated on: Jan 15, 2025 | 6:09 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. जसप्रीत बुमराहची दुखापत पाहता डॉक्टरांनी त्याला आरामाचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने 32 विकेट घेत जबरदस्त कामगिरी केली होती. पण आता त्याला आपल्या पायावर उभं राहणंही कठीण झालं आहे.

जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं
Image Credit source: PTI
Follow us on

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमाल केली. एका बाजूने त्याने खिंड लढवली होती. त्याच्या गोलंदाजीची धार पाहून ऑस्ट्रेलियन फलंदाजानीही धास्ती घेतली होती. या मालिकेत त्याने सर्वाधिक 32 विकेट घेतल्या होत्या. यासाठी त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होतं. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार की नाही याबाबत शंका आहे. कारण शेवटच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह जखमी झाला होता. त्याच्या लोअर बॅकला सूज आली आहे, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह पुढचे काही महिने मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराहबाबत टाइम्स ऑफ इंडियातील वृत्तात दावा केला आहे की, त्याची तब्येत ठीक नाही. त्याला पुढच्या आठवड्यात बंगळुरुच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये पाठवलं जाण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात त्याला कधी पाठवणार हे मात्र अजून ठरलेलं नाही. डॉक्टरांनी बुमराहला रिकव्हरीसाठी घरीत बेड रेस्ट घेण्यास सांगितलं आहे. त्याच्या लोअर बॅकची सूज कमी झाल्यावर पुढे उपचार कसे घ्यायचे ते ठरवलं जाईल.

जसप्रीत बुमराहची स्थिती पाहता त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणं जवळपास अनिश्चित आहे. तसेच त्याला संघात घेण्यासाठी बीसीसीआयही कोणती जोखिम पत्कारेल असं वाटत नाही. बुमराहची दुखापत पाहता त्याचं संघात पुनरागमन कधी होईल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे पुढे उपचार कसे होतात यावर सर्वकाही ठरणार आहे. बुमराहला सर्जरीची गरज पडली तर त्याचं संघातील पुनरागमन लांबणार आहे. टीम इंडियाचे माजी स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक रामजी श्रीनिवासन यांनी सांगितलं की, बुमराहची पाठिची सूज स्नायू किंवा डिस्कमुळे असू शकते.

जसप्रीत बुमराहला दीर्घकाळ आराम करण्यास सांगितलं तर आयपीएल स्पर्धेला मुकू शकतो. त्यानंतर थेट इंग्लंड दौऱ्यात कसोटी खेळताना दिसण्याची शक्यता आहे. पण जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकला तर टीम इंडियाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण आघाडीचे फलंदाज वारंवार फेल जात आहेत. अशा स्थितीत गोलंदाजीची धार खूपच महत्त्वाची आहे.