मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन 7 वर्ष झाली आहेत. यानंतरही त्याने अनेक रेकॉर्डर्स अबाधित आहेत. सचिनचे रेकॉर्ड्स ब्रेक करणं अजूनही फलंदाजांना जमलं नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहलीमध्ये (Virat Kohli) सचिनचे विक्रम मोडीत काढण्याची क्षमता आहे,असं मत अनेक दिग्गजांनी व्यक्त केलं. पण त्यासाठी या दोघांना अनेक वर्ष क्रिकेट खेळावं लागेल. दरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) सचिनचा कसोटीमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढू शकतो, असं विधान इंग्लंडचे माजी फलंदाज जेफ्री बॉयकॉट (Geoffrey Boycott) यांनी केलं आहे. ( joe root can break sachin tendulkar most test runs record, said england former batsman geoffrey boycott)
“रुटमध्ये सचिनचा विक्रम मोडीत काढण्याची कुवत आहे. तो अजून 3o वर्षांचा आहे. त्याने आतापर्यंत 99 कसोटींमध्ये 8 हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तो चांगल्या फॉर्मात आहे. तो याच वेगाने खेळत राहिला आणि दुखापतग्रस्त झाला नाही, तर त्याला सचिनच्या सर्वाधिक धावांचा रकॉर्ड ब्रेक करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही”, असा उल्लेख बॉयकॉट यांनी ‘द टेलीग्राफ’मधील लेखात केला आहे.
“रुटच्या फलंदाजीची तुलना त्याच्या समवयस्क खेळाडूंसोबतच करायला हवी. विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन आणि जो रुट हे समवयस्क आहेत. हे उत्तम फलंदाज आहेत जे शक्य तितक्या जास्त धावा करू शकतात. आपल्याला रूटच्या फलंदाजीचा आनंद लुटला पाहिजे. तर रुटच्या खेळीचं मूल्यांकन हे माजी दिग्गजांसोबत नव्हे तर या खेळाडूंसह करायला हंव”, असं बॉयकॉट यांनी आपल्या लेखात म्हटलंय.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने कसोटीमध्ये एकूण 200 सामने खेळले आहेत. सचिनने 51 शतकांसह 15 हजार 921 धावा केल्या आहेत. ब्रायन लारा रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस यासारख्या दिग्गज खेळाडूंना सचिनचा विक्रम मोडीत काढता आला नाही. त्यामुळे सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम कायम राहणार की मोडीत निघणार हे येत्या काही वर्षात ठरेल.
दरम्यान इंग्लंडचा संघ आता भारत दौऱ्यावर येत आहे. इंग्लंडच्या या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून कसोटीने मालिकेने होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. या सीरिजमधील पहिल्या 2 सामन्यांसाठी दोन्ही संघाची निवड करण्यात आली आहे. कसोटी मालिकेनंतर 5 मॅचेसची टी 20 सीरिज खेळण्यात येणार आहे. तर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सांगता होणार आहे.
संबंधित बातम्या :
( joe root can break sachin tendulkar most test runs record, said england former batsman geoffrey boycott)