लंडन : इंग्लंडला पहिल्यांदा विश्वविजेता होण्यासाठी सर्वात मोठं योगदान देणारा गोलंदाज जोफ्रा आर्चरने विजयानंतर एक हृदय हेलावणारा खुलासा केलाय. या विश्वचषकात जोफ्रा आर्चर इंग्लंडसाठी जेव्हा खेळत होता, तेव्हा काळजावर दगड ठेवून त्याने खेळावर लक्ष केंद्रीत केलं. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच जोफ्रा आर्चरच्या चुलत भावाची बारबाडोसमध्ये हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जोफ्रा आर्चर खचून गेला. पण कुणालाही काहीही न सांगता त्याने खेळण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला विश्वविजेता बनवलं.
जोफ्रा आर्चर हा मूळ कॅरेबियन देश असलेल्या बारबाडोसचा आहे. आर्चरने विश्वचषकापूर्वीच इंग्लंडकडून पदार्पण केलं होतं. या विश्वचषकात त्याने 20 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. जोफ्रा आणि त्याचा भाऊ एशांटियो ब्लॅकमॅन यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं. विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी एशांटियोने जोफ्राला मेसेजही केला होता, अशी माहिती जोफ्राचे वडील फ्रँक आर्चर यांनी दिली.
काही वृत्तांनुसार, 24 वर्षीय एशांटियोचा मृतदेह 31 मे रोजी त्याच्या घराबाहेर सापडला होता. जोफ्राचे वडील मुलाचा खेळ पाहण्यासाठी अंतिम सामन्यासाठी लॉर्ड्सवर येऊ शकले नाही. पण त्याची आई जुली वेट आणि सावत्र वडील प्रॅट्रिक लॉर्ड्सवर उपस्थित होते.
जोफ्राच्या बालपणीच त्याचे पहिले वडील आणि आई एकमेकांपासून वेगळे झाले होते. यानंतर आईने जोफ्राला वडिलांकडे राहू दिलं नाही. त्यामुळे जोफ्रा बालपणीच इंग्लंडला त्याच्या मामाकडे आला. पण त्याला इंग्लंडचं नागरिकत्व त्याच्या सावत्र वडिलांकडून मिळालं आहे.
विश्वचषकात जोफ्रा आर्चरची कामगिरी
इंग्लंडने आपला पहिलावहिला विश्वचषक जोफ्रा आर्चरमुळे जिंकला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, सुपरओव्हरची जबाबदारी आर्चरवर देण्यात आली होती. या सुपरओव्हरमध्येही न्यूझीलंडने बरोबरीच्या धावा केल्या, पण अखेरच्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने न्यूझीलंडला आवश्यक असलेल्या धावा काढू दिल्या नाही आणि विश्वचषकावर नाव कोरलं. संपूर्ण विश्वचषकात जोफ्रा आर्चर इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज ठरला. आर्चरने 11 सामन्यात 20 विकेट्स घेऊन 4.57 च्या इकॉनॉमीने 461 धावा दिल्या.