मिनाक्षी म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सध्या जगात सर्वच काही ऑनलाईन झालं आहे. मग ते जॉबसाठी असो किंवा इतर कुठल्या सरकारी कामासाठी. तसेच खेळही आता ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच खेळांचे फॉर्म ऑनलाईन भरले जातात. सध्या प्रो कबड्डी सुरू आहे, त्यात काही खेळांच्या ऑनलाईन जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एका काबड्डीच्या जाहिरातीमुळे काही खेळाडूंची फसवणूक झाली आहे.
मुंबईच्या एनएससीआय मैदानात कबड्डीच्या निवडीसाठी आलेल्या खेळाडूंची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ही मुले वेगवेगळ्या राज्यांतून मुंबईत आली होती. मैदानात पोहोचल्यानंतर तिथे कुठलीही निवड प्रक्रिया नसून, त्यांची फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 100 हून अधिक खेळाडू मुंबई बाहेरून या निवडीसाठी आले होते. त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन पैसे भरले होते, ज्यानंतर ईमेलमार्फत निवड प्रक्रियेची तारीख खेळाडूंना कळवण्यात आली होती.
जेव्हा हे खेळाडू एनएससीआय मैदानात पोहोचले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर काही कळायच्या आतच या खेळाडूंना मैदानातून बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे खेळाडू संतप्त झाले. या संतप्त खेळाडूंनी ताडदेव पोलीस ठाण्यात धाव घेतली, पण जिथे रजिस्ट्रेशन झालंय तिथेच याची तक्रार केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. ज्यानंतर हे खेळाडू आपआपल्या राज्यात परत जाऊन तक्रार करणार आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी, तसेच या मागील फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी खेळाडूंनी केली आहे.
ऑनलाईन फसवणूक झलेल्या लोकांसाठी सायबर व सायबर एक्स्पर्टकडून आवाहन :
“जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर अगोदर त्या वेबसाईटची पडताळणी करून घ्या. सध्या या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असून, आता लोकांनी सावध होण्याची गरज आहे.”