मुंबई : कॉफी विद करण या टीव्ही शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना महागात पडणार आहे. दोघांवर प्रत्येक दोन वन डे सामन्यांची बंदी घालण्याची शिफारस बीसीसीआयचं कामकाज पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी केली आहे. पंड्या आणि राहुलला बीसीसीआयने नोटीस पाठवत 24 तासात उत्तर मागितलं होतं. पण विनोद राय यांचं दोघांच्याही स्पष्टीकरणाने समाधानी झालेले नाहीत.
हार्दिक पंड्याने बीसीसीआयच्या नोटीसला उत्तर देत माफी मागितली. पण आपण या उत्तराने समाधानी नसल्याचं विनोद राय म्हणाले. दोन्ही खेळाडूंवर दोन सामन्यांची बंदी घालण्याची शिफारस मी केली आहे. पण यावर अजून अंतिम निर्णय बाकी आहे, असं विनोद राय म्हणाले.
काय आहे प्रकरण?
करण जोहरने त्याच्या कार्यक्रमात राहुल आणि पंड्याला त्यांच्या खाजगी आयुष्यावर प्रश्न विचारले होते. यावेळी पंड्याने महिलांविरोधी वक्तव्य केलं. यानंतर तो सोशल मीडियाच्या निशाण्यावर आला आणि ही अत्यंत शरमेची बाब असल्याची टीका त्याच्यावर करण्यात आली.
काही वृत्तांनुसार, बीसीसीआय लवकरच खेळाडूंना अशा शोमध्ये सहभाग घेण्यासाठी बंदी घालणार आहे. क्रिकेटशी संबंध नसलेल्या शोमध्ये खेळाडूंनी जाण्यासाठी परवानगी न देण्याबाबत बीसीसायचा विचार सुरु असल्याचं बोललं जातंय.
हार्दिक पंड्या सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आशिया चषकात दुखापत झाल्यापासून तो संघातून बाहेर होता. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीसाठी त्याची निवड करण्यात आली. 12 तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होत आहे.