मुंबई – लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार के एल राहुलने (KL Rahul) रविवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL2022) मध्ये एकाच संघाविरूध्द तीन शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 37 व्या सामन्यात त्याने अप्रतिम शतक ठोकून राहुलने चांगली कामगिरी केली. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध राहूलने नाबाद 103 धावांची खेळी करून त्याच्या संघाला एकूण 168 धावांपर्यंत पोहोचवलं. धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची दमछाक झाली. त्यामुळे त्यांचा 36 धावांनी पराभव झाला. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सविरुद्ध राहुलचे हे तिसरे शतक आहे. काल झालेल्या सामन्यात त्याने नाबाद 103 धावा काढल्या.
राहुलने तीन वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमधील पहिले शतक झळकावले होते. आयपीएल 2022 मध्ये मुंबई आणि लखनऊ यांच्यातील पहिल्या सामन्यातही राहुलने शतक झळकावले. केएल राहुलने रविवारी टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटूकडून सर्वाधिक शतके ठोकण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रविवारी मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केल्यानंतर राहुलने आपल्या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. संघात अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे त्यांना पर्याय उपलब्ध झाल्याचे सांगितले. आमचा परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न आहे. मी आत्तापर्यंत फलंदाजीचा आनंद लुटला आहे त्याचबरोबर जबाबदारीचा आनंद लुटला आहे असं राहूलने सामना संपल्यानंतर मिडीयाला सांगितलं आहे.
सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत युझवेंद्र चहल या मोसमात अव्वल आहे, ज्याने आतापर्यंत 18 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर हैदराबादचा वेगवान गोलंदाज टीम नटराजन आहे, त्याने आतापर्यंत 15 विकेट घेतल्या आहेत. दिल्लीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच्या खात्यात १३ बळी आहेत. चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा ड्वेन ब्राव्हो आहे, त्याने 12 विकेट घेतल्या आहेत. कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव सध्या पाचव्या क्रमांकावर असून त्याने 11 फलंदाजांना बाद केले आहे.