मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं नातं नवीन नाही. पतौडींपासून युवराज सिंह (Yuvraj Singh) ते विराट कोहलीपर्यंत (Virat Kohli) अशा अनेक क्रिकेटपटूंना बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्नगाठ बांधताना पाहिलं आहे. टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहुलच्या (K L Rahul) बाबतीतही अशीच एक अफवा सध्या ऐकायला मिळत आहे. अभिनेत्री आलिया भटच्या (Alia Bhatt) जीवलग मैत्रिणीसोबत राहुलचं सूत जुळल्याची चर्चा आहे.
पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवापासून सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीपर्यंत अनेक जणींसोबत राहुलचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता के एल राहुलचं नाव जोडलं जात आहे आकांक्षा रंजन कपूर (Akanksha Ranjan Kapoor) हिच्यासोबत.
आकांक्षा ही आलिया भटची जवळची मैत्रीण. आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्याशी आकांक्षाने राहुलची ओळख करुन दिली होती. आकांक्षाने राहुलसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर दोघं डेट करत असल्याच्या चर्चांना खतपाणी मिळालं. के एल राहुलने अखेर या चर्चांवर उत्तर दिलं आहे.
‘अरे, माझ्याबद्दल असं पण काही लिहिलं जात आहे का? मी पेपर वाचत नाही, त्यामुळे मला माझ्याबद्दल रंगणाऱ्या गॉसिपची कल्पना नाही. आपलं वैयक्तिक आयुष्य वैयक्तिक राहावं याची मी काळजी घेतो. त्याबद्दल चर्चा होणार नाही, हे मी बघतो. सध्या तरी मी क्रिकेटशी कमिटेड आहे’ असं उत्तर राहुलने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत दिलं.
‘तू सिंगल आहेस का?’ या प्रश्नाला राहुलने बगल दिली. ‘खरं तर मलाच माहिती नाही. जेव्हा मला हे समजेल, तेव्हा मी तुम्हाला सांगेन’ अशा शब्दात राहुलने थेट उत्तर देणं टाळलं.
‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हार्दिक पंड्यासोबत हजेरी लावल्यानंतर के एल राहुलला विनाकारण फटका बसला होता. मात्र त्यानंतर राहुलने संघात पुनरागमन केलं आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब कडून राहुल खेळला. दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी विश्वचषकात सलामीवीर म्हणून के एल राहुलची वर्णी लागली. त्यावेळी त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकं ठोकून आपली चुणूक दाखवली होती.
क्रिकेटपटू आणि अभिनेत्रीच्या प्रसिद्ध जोड्या
माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर
कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा
हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा
झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे
युवराज सिंग आणि ब्रिटीश अभिनेत्री हेझल कीच
ऑल राऊंड क्रिकेटपटू मनोज प्रभाकर आणि अभिनेत्री फरहीन खान
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अभिनेत्री संगीता बिजलानी (आता विभक्त)
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार विव रिचर्ड्स आणि अभिनेत्री नीना गुप्ता (लिव्ह इन)