कोलंबो : मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगा लवकरच संघात दाखल होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला संपूर्ण आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. क्रिकइंफोच्या वृत्तानुसार, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने विश्वचषकात खेळण्यासाठी मायदेशातील मालिकेत खेळणं अनिवार्य केलं होतं. यामुळे मलिंगाने आयपीएलमधील सुरुवातीच्या सहा सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
मलिंगाच्या या निर्णयानंतर बीसीसीआयने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला मलिंगाला शक्य तेवढं लवकर रिलीज करण्याची विनंती केली होती. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयची ही विनंती मान्य करत मलिंगाला मुंबईकडून जास्तीत जास्त सामने खेळण्यासाठी मुभा दिली.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने याबाबतीत मंगळवारी अधिकृत माहिती दिली. मलिंगाला संपूर्ण आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. श्रीलंकेत सुरु असलेल्या वन डे मालिकेतून माघार घेण्याची परवानगी मलिंगाला मिळाली आहे, ज्यामुळे तो मुंबई इंडियन्ससाठी जास्तीत जास्त सामने खेळू शकतो, असं श्रीलंकन बोर्डाने म्हटलंय.
मलिंगा हा मुंबई इंडियन्सच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. सुरुवातीच्या सामन्यातच मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला.