नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत असलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने महाराष्ट्रातील फुटबॉल खेळाडूंना अद्यावत प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीने जर्मनीमधील प्रसिद्ध असलेल्या बायर्न फुटबॉल क्लब यांच्यासोबत केलेल्या करारनाम्यानुसार आज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिकच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील 14 वर्षातील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे अंतिम सामने संपन्न झाले.
आजच्या दिवसामध्ये रविवारी झालेल्या सर्व सामन्यांमध्ये सर्व संघांनी अत्यंत चुरशीचा खेळ केला. परंतु या सर्वांवर मात देत देवळाली कॅम्पचा बार्न्स स्कूल देवळाली कॅम्प आणि शरद पवार पब्लिक स्कूल कळवण या दोन संघांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला अंतिम फेरी च्या निर्धारित वेळेमध्ये दोन्ही संघांनी अत्यंत चुरशीचा खेळ करत निर्धारित वेळेमध्ये तीन विरुद्ध तीन अशा प्रकारे समसमान गोल संख्या करून सामना बरोबरीत सोडवला.
पेनल्टी शूटआउट मध्ये देखील पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये दोनही संघ समान गोल संख्या असल्याने पुढे झालेल्या सदन डेथ मध्ये बार्न्स स्कूल देवळाली कॅम्प यांनी शरद पवार पब्लिक स्कूल चा 12 विरुद्ध 11 गोल पराभव करत विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.
दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी त्रंबक रोड नाशिक या ठिकाणी विभागीय स्पर्धेचा थरार रंगणार आहे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्टिकच्या सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी प्रयत्न केले.
राज्याच्या वेगवेगळ्या भागात जिल्हा स्तरावर या स्पर्धा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या मातीतून उत्तम फुटबॉलपटू घडवणं हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एक विजेता संघ निवडला जाणार आहे. विजेत्या टीमची दुसऱ्या जिल्ह्याच्या टीम बरोबर मॅच होईल. हा या स्पर्धेचा दुसरा टप्पा असणार आहे.
या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ दाखवणाऱ्या 20 फुटबॉलपटूंना जर्मनीला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. बार्यन म्युनिच क्लबमध्ये महाराष्ट्रातील या खेळाडूंना ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
राज्यातील उदयोन्मुख फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने पाहण्याची, सराव करण्याची आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसोबत कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. जर्मनीच्या विविध फुटबॉल क्लबसोबत या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल.