मुंबई: फुटबॉल हा जागतिक स्तरावरील लोकप्रिय खेळ आहे. नुकत्याच झालेल्या फीफा वर्ल्डकप स्पर्धेतून याची प्रचिती आली आहे. क्रिकेटप्रेमी देशात फुटबॉलची क्रेझ पाहून अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे. आता फुटबॉल या खेळाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जर्मनीच्या एफसी बायर्न क्लबसोबत करार केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलपटू घडवण्यासाठी कंबर कसली आहे. 14 वर्षांखालील फुटबॉलपटूंसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. 36 जिल्ह्यातील काही शाळांनी जिल्हावर टप्प्यात आपला सहभाग नोंदवला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर यासह इतर जिल्ह्यांमध्ये स्पर्धेचा थरार सुरु आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एक विजयी पुढच्या स्तरावर आगेकूच करणार आहे. त्यानंतर विभागवार स्पर्धा होतील आणि शेवटी पुण्यात अंतिम टप्प्यातील संघ भिडणार आहेत. या स्पर्धेवर एफसी बायर्न मुनिच क्लबची बारीक नजर आहे. या स्पर्धेतील 20 टॉप खेळाडूंची निवड करून जर्मनीत क्लबमार्फत ट्रेनिंग दिलं जाणार आहे. म्हणजेच क्रिकेटच्या मातीत भविष्यात उत्तम फुटबॉलपटू यात शंकाच नाही.
मुंबईत कुपरेज आणि कर्नाटका मैदानात प्राथमिक स्तरातील स्पर्धा पार पडल्या. यापैकी चार संघाची आपआपल्या गटातील उपांत्य फेरीत वर्णी लागली आहे. कुपरेज मैदानात बीजेपीसी विरुद्ध मराठा मंदीर, सेंट जोसेफ वडाळा विरुद्ध अँटोनिओ डिसिल्वा, बॉम्बे स्कॉटिश विरुद्ध सेंट पॉल यांच्यात सामना रंगला. या स्पर्धेतून बीजेपीसी, कॅम्पियन स्कूल, सेंट जोसेफ आणि सेंट पॉल या शाळांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
उपांत्यपूर्व फेरीत बीजेपीसी विरुद्ध कॅम्पियन स्कूल यांच्यात लढत झाली. कॅम्पियन स्कूलनं बीजेपीसी शाळेचा 1-0 ने धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. तर सेंट जोसेफ वडाळा आणि सेंट पॉल या संघात उपांत्यपूर्व फेरीची दुसरी लढत झाली. हा सामना सेंट पॉल संघाने 0-3 ने जिंकला आणि उपांत्य फेरीत धडक मारली.
कर्नाटका मैदानात बॉम्बे स्कॉटिश ए विरुद्ध व्हीएन सुळे, सिताराम मिल विरुद्ध हॉली नेम ए, सेंट झेव्हियर विरुद्ध आदित्य बिर्ला, सेंट पॉल विरुद्ध सेंट मेरी स्कूल यांच्यात सामना रंगला. यापैकी बॉम्बे स्कॉटिश, होली नेम, सेंट मेरी आणि आदित्य बिर्ला संघानं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत बॉम्बे स्कॉटिश ए संघानं होली नेम ए संघाला 2-0 नमवलं आणि उपांत्य फेरीत धडक मारली. तर सेंट मेरी ए शाळेनं आदित्य बिर्ला शाळेचा 2-0 धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली.