कोल्हापूर: महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर, पैलवान बाला रफिक शेखने कुस्तीचे धडे गिरवलेल्या कोल्हापूरला भेट दिली. कोल्हापूरकरांनीही बालाचं जंगी स्वागत केलं. बालाने छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतलं. यावेळी बालाचं कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत करण्यात आलं. हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचे पुत्र अभिजीत आंदळकर यांनी बालाचं स्वागत केलं.
महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखने मानाची गदा गुरु हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांना अर्पण केली. दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बालाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बाला न्यू मोतीबाग तालमीत गेला. ज्या ठिकाणी त्याने कुस्तीचे धडे घेतले होते त्याठिकाणीही बालाचे जंगी स्वागत केले. वस्ताद गणपतराव आंधळकर ज्या ठिकाणी बसून कुस्तीचे धडे द्यायचे त्याठिकाणी बालाने नमस्कार करत, वस्तादांच्या जागेवर मानाची गदा अर्पण केली.
बाला रफिक शेख ‘महाराष्ट्र केसरी’
जालना इथं रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2018 ची फायनल लढत पार पडली. यामध्ये करमाळ्याच्या बाला रफिक शेखने पुण्याच्या अभिजीत कटकेवर 11-3 गुणांनी मात करत, महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
कोण आहे बाला रफिक शेख?
बाला रफिक शेख हा मूळचा सोलापूरचा आहे. तो कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीचा पैलवान आहे. त्याच्या घरात 10 वर्षांपासून कुस्तीची परंपरा चालत आली आहे. बाला रफिक शेखचे वजन-120 किलो, तर उंची-6 फूट आहे. बाला रफिक शेख वयाच्या 13 व्या वर्षी कुस्तीसाठी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाला. हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचा तो शिष्य आहे. त्याने डबल महाराष्ट्र केसरी ठरलेल्या चंद्रहार पाटलांकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. तो सध्या पुण्याच्या हनुमान आखाड्यात सराव करतो.
बाला रफिकच्या घरची परिस्थिती बिकट. पैलवानाला लागणारा दोन वेळचा हवा तसा खुराकही त्याला व्यवस्थित मिळत नव्हता. तरीही आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे सिद्ध करुन दाखवले की, परिस्थिती कशीही असेल, तरीही जर आपण ठरवलं तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
संबंधित बातम्या
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून ‘महाराष्ट्र केसरी’ बाला रफीक शेखची माघार
आधी ‘दगडूशेठ’, आता ‘वारी’, बाला रफिक शेख देवाच्या दारी
जालना : ‘मला आत्मविश्वास होता की, मी त्याला हरवणारं’- महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख
‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी बाला रफिक शेख कोण आहे? जाणून घ्या