मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Team India head coach Ravi Shastri) यांचा कार्यकाळ आगामी वेस्ट इंडिज दौरा झाल्यानंतर संपणार आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकांच्या सर्व पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सध्याच्या प्रशिक्षकांनाही पुन्हा नव्याने अर्ज करुन सर्व प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. विश्वविजेत्या भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्त्वातील क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकांबाबत अंतिम निर्णय घेईल. अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यात रस दाखवलाय. यात आता श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेच्याही (mahela jayawardene) नावाचा समावेश झालाय.
महेला जयवर्धनेकडे (mahela jayawardene) फलंदाजी प्रशिक्षकाचा अनुभव आहे. अत्यंत कमी कालावधीसाठी त्याने इंग्लंडसाठी सह प्रशिक्षक म्हणून काम पाहिलंय. याशिवाय साऊथेम्पटनमधील फ्रँचायझी सदर्न ब्रेवच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत जयवर्धने सर्वात पुढे आहे. पण एका वेबसाईटनुसार, जयवर्धनेला सध्या रवी शास्त्रींची जागा घेण्याची इच्छा आहे. जयवर्धने संघाशी जोडलेला असतानाच मुंबई इंडियन्सने दोन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवलं होतं.
चार वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवणारा मुंबईचा संघ आजही सर्वात यशस्वी मानला जातो. जयवर्धने फलंदाजी प्रशिक्षक असतानाच मुंबईने तीनपैकी दोन वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवलाय. काही वृत्तांनुसार, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी टॉम मुडी, गॅरी कर्स्टन आणि महेला जयवर्धने यांनी रस दाखवलाय.
महेला जयवर्धनेची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केल्यास तो भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह चांगलं काम करु शकेल, असंही बोललं जातंय. दोघांनाही आयपीएलमध्ये सोबत काम करण्याचा अनुभव आहे. याचाच फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात पुढच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला पुन्हा एकदा प्रबळ दावेदार बनवण्यासाठी हा बदल महत्त्वाचं असल्याचंही म्हटलं जातंय.
टॉम मुडी यांनी यापूर्वीही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यांनी नुकताच सनरायझर्स हैदराबादसोबतचा करार संपवला आहे. टॉम मुडी यांच्या कार्यकाळात श्रीलंकेनेही चांगलं यश मिळवलंय. वेस्ट इंडिज दौऱ्याहून परतल्यानंतर रवी शास्त्री त्यांची जागा कायम ठेवतात की नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.