लंडन : भारतीय यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी प्रत्येक सामन्या दरम्यान काही ना काही इतिहास रचत असतो. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर मंगळवारी (9 जुलै) भारत विरुद्ध न्युझीलंडमधील सेमीफायनलमध्ये धोनीने नवा इतिहास रचला आहे. धोनी वन डे (ODI) क्रिकेट सामन्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर 350 सामने खेळणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. धोनीच्या या नव्या विक्रमामुळे त्याचा चाहतावर्गही त्याचे कौतुक करत आहे.
धोनीने 350 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये 346 भारतासाठी आणि 3 सामने आशिया XI साठी खेळले आहेत. तसेच जागतिक क्रिकेटमध्ये 350 वन डे सामने खेळणारा दहावा खेळाडू म्हणून धोनीने टॉप टेनच्या यादीत स्थान मिळवले आहे.
धोनीचा नवा विश्वविक्रम
जागतिक क्रिकेटमध्ये धोनी असा पहिला खेळाडू आहे ज्याने सलग यष्टीरक्षक म्हणून 350 वन डे सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. श्रीलंकेचा यष्टीरक्षक संगकाराने 360 सामने खेळले आहेत. पण यष्टीरक्षक म्हणून सर्व सामने संगकाराने सलग खेळले नाहीत. भारतासाठी खेळण्यात आलेल्या प्रत्येक वन डे सामन्यात धोनी यष्टीरक्षक म्हणून होता.
धोनीने आपल्या 350 वन डे सामन्यात 200 वेळा संघासाठी कर्णधारपदाची भूमिका सांभाळली आहे. यामध्ये धोनी जागतिकपातळीवर तिसरा आणि भारतासाठी पहिला क्रिकेटर आहे.
सर्वाधिक ODI खेळणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर (463), महेला जयवर्धन (448), सनथ जयसूर्या (445), कुमार संगकारा (404), शाहिद आफरीदी (398), इंजमाम-उल-हक (378), रिकी पाँटिंग (375), वसीम अक्रम (356) आणि मुथैया मुरलीधरन (350)