हैदराबाद: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान शनिवारपासून हैदराबादेत सुरु होणाऱ्या वन डे मालिकेपूर्वी, भारताची धाकधूक वाढली आहे. कारण टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. 2 मार्च अर्थात उद्यापासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला सुरुवात होत आहे.
त्यापूर्वी 37 वर्षीय धोनी नेटप्रॅक्टिस करत होता. त्यावेळी टीम इंडियाचे सहयोगी स्टाफ राघवेंद्र यांनी धोनीकडे बॉल फेकला. हा बॉल धोनीच्या डाव्या हाताला लागल्याने त्याला दुखापत झाली.
धोनीने आज बराचवेळ फलंदाजीचा सराव केला. त्यानंतर सर्व खेळाडूंचा क्षेत्ररक्षणाचा सराव सुरु होता. त्यावेळी धोनीच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे धोनीला सराव अर्ध्यात सोडावा लागला.
धोनीची दुखापत गंभीर आहे की नाही, तो पहिल्या वन डे सामन्यात खेळणार की नाही, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. जर धोनी उद्याच्या सामन्यात खेळू शकला नाही, तर रिषभ पंतकडे विकेटकीपिंगची धुरा असेल.
हैदराबाद वन डेत अंतिम 11 जणांमध्ये लोकेश राहुल आणि अंबाती रायडू या दोघांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.