मुंबई : एमएस धोनी हे नाव गेली कित्येक वर्षे भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दिला पूर्णविराम दिल्यानंतरही धोनीची जादू आयपीएलमध्ये दिसत आहे. आतापर्यंत त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सनं चार वेळा जेतेपद जिंकलं आहे. यंदा पाचव्यांदा जेतेपदासाठी धोनीच्या नेतृत्वाखाली संघ सज्ज आहे. धोनी है तो मुमकीन है असंच काहीसं क्रिकेटप्रेमी म्हणत आहेत. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत धोनी नव्या विक्रमांना गवसणी घालणार आहे.
41 वर्षीय धोनींमध्ये आता पूर्वीसारखा दम राहिला नाही, अशी टीका माजी क्रिकेटपटू करतात. पण शेर बुढा हो गया तो शिकार करना छोडता नही, असंच काहीसं म्हणावं लागेल. आता महेंद्रसिंह धोनी तीन विक्रम मोडीत काढण्याच्या तयारीत आहे. काय आहेत हे विक्रम पाहुयात
धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 206 डाव खेळले असून 4978 धावा केल्या आहेत. आता गुजरात विरुद्धच्या सामन्यात 22 धावा करताच. पहिला फुलटाईम विकेटकीपर फलंदाज म्हणून 5000 धावा त्याच्या नावावर होणार आहेत. तर 185 धावा करताच सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एबी डिव्हिलियर्सला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर येईल.
आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी सर्वाधिक सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने 15 पर्वात आतापर्यंत 234 सामने खेळले आहेत. या सिझनमध्ये 16 सामने खेळत त्याच्या नावावर 250 सामने होऊ शकतात. या यादीत धोनीनंतर दिनेश कार्तिकचं नाव येतं. त्याने आयपीएलमध्ये 229 सामने खेळले आहेत.
धोनी मार रहा है…! हा चित्रपटातील संवाद तुम्ही प्रत्यक्षात मैदानात पाहिला असेल. एकदा का धोनीची बॅट तळपली की चेंडू सरळ सीमारेषेपारच गेला समजा. धोनीने आयपीएलमध्ये एकूण 229 षटकार ठोकले आहेत. या स्पर्धेत 21 षटकार ठोकताच 250 षटकारांचा मानकरी ठरणार आहे.तसेच ही कामगिरी करणारा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरणार आहे.
महेंद्रसिंह धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल, याबाबत चर्चांना उधाण आला आहे. मात्र महेंद्रसिंह धोनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. तर त्याचा फिटनेस पाहता तो आणखी दोन वर्षे खेळू शकतो, असं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सांगितलं होतं.
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.