मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिका आता रंगतदार वळणारवर आली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. तसेच उर्वरित दोन सामन्यात भारताचं पारडं जड वाटत आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि मायकल क्लार्क यांच्या शाब्दिक चकमक उडाली आहे.सौरव गांगुलीच्या मते, भारत ही मालिका 4-0 ने जिंकेल आणि ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश देईल. सौरव गांगुलीच्या भाकितावर मायकल क्लार्क जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “ऑस्ट्रेलियन संघ जोरदार पुनरागमन करेल. पण सौरव गांगुली असं बोलून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघावर विनाकारण वजन टाकत असल्याचं वाटत आहे.”
“मला आशा आहे की, ऑस्ट्रेलियनं संघ कमबॅक करेल. जर त्यांनी तसं केलं नाही तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट फॅनच्या तिखट प्रतिक्रियांना सामोरं जावं लागेल. मला माहिती आहे सौरव गांगुली 4-0 चं भाकीत का वर्तवत आहे? हे मी समजू शकतो.”, असं मायकल क्लार्क म्हणाला. दुसरीकडे, त्याने मुख्य प्रशिक्षक आंद्रे मॅकडोनाल्ड यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन थिंक टँकवर टीका केली.
“प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडॉनल्ड आणि संघानं भारतात जाऊन चांगला सराव करणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. तुम्ही जर भारतात जाऊ शकत नव्हता. तर युएई टूरचं आयोजन करायचं होतं. भारतात ऑस्ट्रेलियासारखी परिस्थिती नाही. त्या पद्धतीने खेळणं म्हणजे चुकीचंच ठरेल. भारतात फिरकीची जादू चालते. तेव्हा मी त्या परिस्थितीनुसारच प्रशिक्षण देईल आणि यशस्वी होईल.”, असंही मायकल क्लार्कनं सांगितलं.
सौरव गांगुलीने पीटीआयशी बोलताना सांगितलं होतं की, “आपण ऑस्ट्रेलियाच्या जुन्या टीमचं या टीमशी तुलना करतो, ही आपली समस्या आहे. या टीममध्ये मॅथ्यु हेडन, जस्टिन लँगर, रिकी पाँटिंग, स्टीव आणि मार्क वॉ, अॅडम गिलख्रिस्टसारखे खेळाडू नाहीत. त्याचबरोबर तशी क्षमता असणारे खेळाडू नाहीत.”
“स्टीव्ह स्मिथ चांगला खेळाडू आहे. डेविड वॉर्नरला सूर गवसत नाही. मार्नस चांगला खेळाडू आहे पण अशा परिस्थितीत चांगली खेळी करणं कठीण आहे. त्यामुळे जुन्या टिमशी तुलना करून खेळणं चुकीचं ठरेल.”, असंही सौरव गांगुलीने पुढे सांगितलं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतासाठी तिसरा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना भारताने जिंकला तर अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. त्याचबरोबर दुसऱ्यांचा अंतिम फेरी गाठणारा संघ ठरेल. आयसीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.