लंडन : मोदी है तो मुमकीन है या घोषणेने यावेळची लोकसभा निवडणूक गाजली. पण ही घोषणा इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातही ऐकायला मिळत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात साऊथेम्पटनच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची क्रेझ पाहायला मिळाली. भारतीय चाहत्यांकडून ‘मोदी है तो मुमकीन है, विराट है तो विजय है’ अशा घोषणा दिल्या जात आहेत.
या विश्वचषकातला भारताचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांनी मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. भारतामधूनही अनेक भारतीय सामना पाहण्यासाठी साऊथेम्पटनला गेले आहेत, तर ब्रिटनमध्येही भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळे साऊथेम्टनचं मैदान ‘मोदी है तो मुमकीन है, विराट है तो विजय है’ या घोषणांनी दणाणून गेलंय.
टीम इंडियाने या सामन्यासाठी कसून सराव केलाय. सलग दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर पहिला विजय मिळवण्यासाठी दबाव आहे, तर संपूर्ण ताकदीने उतरलेला भारतीय संघ दुसरीकडे आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच गोलंदाज जसप्रीत बुमराने दोन विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्येही बुमराचा फॉर्म दिसला होता. हा फॉर्म कायम असल्याचं त्याने दाखवून दिलंय.
भारतीय संघ :
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेशराहुल, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक, विजय शंकर
दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्विंटन डी कॉक, एडन मार्करम, फफ डू प्लेसिस, डेव्हिड मिलर, रस्सी वॅन डर डस्सेन, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुक्वायो, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबाडा, इम्रान ताहिर, ब्युरेन हँडरिक्स, ड्वेन प्रेटोरियस, हाशिम आमला, तब्रेज शमसी