यूएई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात चेन्नई सुपर किंग्जसला (Chennai Super Kings) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले ऑफमधली आपली दावेदारी सिद्ध करता आली नाही. चेन्नईची या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि इतर खेळाडूंनाही या मोसमात चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान या मोसमानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मोठ्या खुबीने सुरु होत्या. मात्र मी एवढ्यात निवृत्ती घेणार नाही. चेन्नईसाठी खेळत राहणार असल्याचं धोनीने ठासून सांगितलं आहे.
चेन्नई सुपर किंग्जची लढत आज (रविवार) किंग्ज इलेव्हन पंजाबशी होत आहे. यावेळी टॉसदरम्यान येलो जर्सीमधला तुझा अखेरचा सामना आहे का? असा प्रश्न धोनीला विचारण्यात आला. यावर माझा आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा सध्या कोणताही विचार नाही. मी चेन्नईसाठी आयपीएल खेळत राहीन, असं स्पष्ट शब्दात धोनीने सांगितलं.
कॉमेंटेटर डॅनी मॉरिसन यांनी धोनीला, ‘पिवळ्या जर्सीतली ही तुझी शेवटची मॅच का?’, असा प्रश्न विचारला. यावर, ‘नाही.. पिवळ्या जर्सीतील ही माझी शेवटची मॅच नाही. सध्या माझा आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा विचार नाही’, असं सांगत धोनीने त्याच्या निवृत्तीविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
पुढच्या हंगामात धोनी चेन्नईचे नेतृत्व करणार की नाही, याबाबत चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी देखील याआधी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या मोसमात देखील धोनी चेन्नईचा नेतृत्व करताना दिसेल, असा विश्वास काशी विश्वनाथन यांनी व्यक्त केला आहे.
“धोनी आयपीएलच्या 14 व्या मोसमात म्हणजेच 2021 मध्ये चेन्नईचे निश्चितच नेतृत्व करेल. धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नईला 3 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. आम्ही या वर्षीच प्ले ऑफमध्ये पोहचलो नाही. एक वर्ष निराशाजनक कामगिरी राहिली, म्हणजे सर्वच संपलं असं होत नाही”, असं सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले.
“यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीआधीच ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना आणि हरभजन सिंह या दोघांनी माघार घेतली. तसेच चेन्नईच्या काही खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली. यासर्व प्रकारामुळे चेन्नईचे संतुलन बिघडले, असंही विश्वनाथन यांनी नमूद केलं. “या मोसमात आम्हाला आमच्या लौकीकानुसार कामगिरी करता आली नाही. आम्ही जिंकण्याचे सामनेही गमावले. त्यामुळे आम्ही मागे राहिलो”, अशी खंत ही विश्वनाथन यांनी व्यक्त केली.
धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 202 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 136.89 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 631 धावा केल्या आहेत. यामध्ये 23 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीची 84 नाबाद ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीला या 13 व्या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नाही. धोनीने या मोसमात आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले. यामध्ये 118.45 च्या स्ट्राईक रेटने 199 धावा केल्या आहेत. धोनीला या 12 सामन्यात एकही अर्धशतक लगावता आले नाही. धोनीची या मोसमातील 47 नाबाद ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार चेन्नई पॉइंट्सटेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच 8 व्या क्रमांकावर आहे. चेन्नईने या मोसमात एकूण 12 सामने खेळले आहेत. यापैकी केवळ 4 सामन्यातच चेन्नईचा विजय झाला आहे. तर 8 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान चेन्नई या मोसमातील आगामी सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे.
IPL 2020 | चेन्नई सुपर किंग्जसचे आव्हान संपुष्टात, साक्षी धोनीची भावूक पोस्ट