चेन्नई : आयपीएलमध्ये आज रंगतदार सामना होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियान्स यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना चेन्नईत खेळवला जाईल. दोन्ही संघांची नजर फायनलचं तिकीट गाठण्यावर असेल. ज्या संघाचा पराभव होईल, त्यांना आणखी एक संधी मिळेल. पण विजयी संघ थेट फायनलचं तिकीट मिळवणार आहे. पराभूत संघाला क्वालिफायर दोन सामन्यात एलिमिनेटरमध्ये विजयी संघासोबत खेळावं लागेल.
एलिमिनेटरमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होईल. चेन्नई गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती, पण किंग्ज इलेव्हन पंजाबकडून मिळालेला पराभव आणि मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर मिळवलेला विजय यामुळे मुंबईने अव्वल स्थान प्राप्त केलं. या मालिकेत मुंबई आणि चेन्नई यांच्यात दोन वेळा लढत झाली. दोन्ही वेळा मुंबई इंडियन्सचा विजय झाला होता.
मुंबई इंडियन्सची जमेची बाजू
चेन्नईला त्यांच्याच होमग्राऊंडवर पराभवाची धूळ चारणारा मुंबई इंडियन्स या मालिकेतला पहिला संघ आहे. मुंबईविरुद्धच्या दोन्ही सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे चेन्नई यावेळी मुंबईला हलक्यात घेणार नाही. मुंबईच्या या मोसमाची सुरुवातच पराभवाने झाली होती. पण नंतर जी लय पकडली, ती अखेरपर्यंत कायम राहिली.
कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात करुन देण्यात बहुतांश सामन्यांमध्ये यश मिळवलं. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने अनेकदा बाजू सांभाळली. अखेरच्या षटकांमध्ये वेगाने धावा करणं ही मुंबईची जमेची बाजू राहिली. यामध्ये सर्वात मोठी भूमिका राहिली ती अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची. कायरन पोलार्डनेही पंड्याला साथ दली.
गोलंदाजीमध्येही मुंबई इंडियन्स मागे नाही. जसप्रित बुमरा आणि लसिथ मलिंगा ही मुंबईची जमेची बाजू म्हणावी लागेल. कारण, अखेरच्या षटकांमध्ये बुमराच्या गोलंदाजीवर धावा काढणं फलंदाजासाठी जवळपास अशक्य होऊन जातं. शिवाय मलिंगानेही या मोसमात त्याचा फॉर्म दाखवून दिलाय. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाजू मजबूत असलेला संघ म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं.
चेन्नई सुपरकिंग्जची जमेची बाजू
सीएसकेने क्वालिफायरपर्यंत मजल मारली असली तरी जे पराभव स्वीकारावे लागले, ते चुकांचेच परिणाम होते. काही सामन्यांमध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीची अनुपस्थिती होती, तर काही सामन्यात गोलंदाजी अपयशी ठरली. फलंदाजीमध्ये मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू केदार जाधव दुखापतग्रस्त झाल्यामुळे चेन्नईची चिंता वाढली आहे. दरम्यान, शेन वॉट्सन, सुरेश रैना, ड्वेन ब्रावो, अंबाती रायुडू आणि जबरदस्त फॉर्मात असलेला धोनी हे दमदार पर्याय सीएसकेकडे आहेत.
मुंबईच्या तुलनेत चेन्नईची गोलंदाजी ही धोनीसाठी चिंतेची बाब आहे. कारण, बुमरासारखा कोणताही पर्याय चेन्नईकडे दिसत नाही. यामध्ये अनुभवी असलेला हरभजन सिंह आणि शेन वॉट्सन यांच्यावर सर्व जबाबदारी येते. शिवाय ब्रावोकडूनही धोनीला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, युवराज सिंह, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंडेय, हार्दिक पंड्या, राहुल चहर, क्रृणाल पंड्या, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, एविन लुईस, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लंघन, एडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जायसवाल, रसिख सलाम, जसप्रीत बुमराह
चेन्नई सुपरकिंग्ज : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अंबाती रायुडू, शेन वॉट्सन, सुरेश रैना, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हरभजन सिंह, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मिशेल सेंटनर, डेविड विली, सॅम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा