ठाणे : राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा काल (12 मे) टँकरच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला. ही घटना कल्याण शीळ रोडवरील लोढा सर्कल याठिकाणी घडली. ट्रॅफिक पोलिसांच्या समोर भरधाव टँकरने कॅरमपटूचा जीव घेतल्याने कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जान्हवीला राष्ट्रीय कॅरम स्पर्धा जिंकून आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे स्वप्न होते. मात्र ते आता स्वप्नच राहिले आहे.
डोंबिवली पूर्वेतील मेडोज लोढा परिसरात राहणारी जान्हवी मोरे ही राष्ट्रीय स्तरावर कॅरमपटू होती. तिने आतापर्यंत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कास्य पदकं मिळवली होती. शाळेत असल्यापासून जान्हवीला कॅरमची आवड होती. ती देशातील अव्वल पाचच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. डिसेंबर 2019 मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. ही स्पर्धा जिंकून तिला अव्वल क्रमांक गाठायचा होता. हेच स्वप्न तिच्या कुटुंबियांचे आणि मित्र मंडळींचे होते.
जान्हवी कुटुंबासोबत तिच्या महाड येथील गावी गेली होती. गावाहून ती 11 मे रोजी परतली. त्यानंतर तीने कालच पहिल्या दिवशी कॅरम स्पर्धेसाठीचा सराव सुरु केला. हा सराव संपवून ती तिचा मित्र अक्षय पिंपूटकर याच्यासोबत डोंबिवली स्टेशनकडे जाण्याच्या बेतात होती. त्यावेळी ती सायंकाळी सहाच्या सुमारास लोढा सर्कलजवळ आली. तेव्हा ट्रॅफिक पोलिसांनी वाहने रोखून रस्ता ओलांडण्याचा इशारा दिला होता. रस्ता ओलांडत असताना जान्हवी आणि तिच्या मित्रानेसुद्धा रस्ता ओलांडला. याच दरम्यान वाहतूक पोलिसाची पाठ वळताच एक भरधाव टँकर समोर आला. त्याने जान्हवीला जोरदार धडक दिली. ती त्याठिकाणी बेशुद्ध पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
“चूक पोलिसांची असेल किंवा टँकर चालकाची. मात्र आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तिच्यासह तिचे स्वप्न भंगले आहे. याला जबाबदार कोण?”, असा सवाल जान्हवीच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी ट्रक चालक रोहिदास बटूळे याला अटक केली आहे.