नवी दिल्लीः भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Star javelin thrower Neeraj Chopra) दुखापतीतून बरे झाल्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. नीरज चोप्राने शुक्रवारी 89.08 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह लुसाने डायमंड लीगचे (Lausanne Diamond League) विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. हे विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. या विजेतेपदासह नीरजने झुरिच येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला आहे. हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही (World Championship 2023) तो पात्र ठरला असल्याचे सांगण्यात आले आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भालाफेक करुन स्पर्धक खेळाडूंना त्या रेषेपर्यंत जाणे महाग करुन टाकले होते. त्यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटर भाला फेक केली, तर तिसरा प्रयत्न मात्र त्याने घेतला नाही. त्यानंतर नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात फाऊल घोषित झाला आणि त्याने पाचव्या प्रयत्नापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.
आपल्या अंतिम थ्रोमध्ये नीरज चोप्राने 80.04 मीटरचे लक्ष्य गाठून आपल्या नावावर मोहोर उमटवली. लुसाने डायमंड लीगमध्ये, टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जेकब वडलेजने 85.88 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरे स्थान मिळवले तर यूएसएच्या कर्टिस थॉम्पसनने 83.72 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह तिसरे स्थान पटकावले आहे.
नीरज चोप्राच्या कारकिर्दीतील 89.08m हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न होता. नीरजच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट थ्रोबद्दल सांगताना म्हटले जाते की, त्याने स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 वर भाला फेकला होता.
पानिपतचा रहिवासी असलेला नीरज चोप्रा डायमंड लीग जिंकणारा हा पहिला भारतीय ठरला आहे. तसेच डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पोहोचणाराही तो पहिलाच भारतीय ठरला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. चोप्रा हा पूर्वी, डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीगच्या पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे.
पहिला प्रयत्न – 89.08 मीटर
दुसरा प्रयत्न – 85.18 मीटर
तिसरा प्रयत्न – भालाफेक केला नाही
चौथा प्रयत्न – फाउल
पाचवा प्रयत्न – भालाफेक केला नाही
सहावा प्रयत्न – 80.04 मीटर