लंडन : महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी भागीदारीनंतरही भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच या विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवासही इथेच संपला. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (दुसरा सेमीफायनल) विजेत्या संघासोबत न्यूझीलंडची फायनलमध्ये लढत रंगणार आहे. 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सर्वबाद 221 धावांपर्यंत मजल मारता आली.
ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर न्यूझीलंडने सुरुवातीलाच भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलं. सुरुवातीच्या 5 धावांमध्ये महत्त्वाचे फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल प्रत्येकी 1-1-1 धावा करुन बाद झाले. भारताच्या फलंदाजीची सर्वात मजबूत फळी माघारी परतल्यानंतर रिषभ पंत (32) आणि हार्दिक पंड्या (32) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. यानंतर रवींद्र जाडेजाने 59 चेंडूत 77 धावांची खेळी करत भारताच्या फायनलच्या अपेक्षा जीवंत ठेवल्या. पण ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर जाडेजा बाद झाला.
जाडेजानंतर सर्व जबाबदारी धोनीवर आली. पण जलद धावा काढण्याच्या प्रयत्नात असतानाच धोनी दुर्दैवाने धावबाद झाला आणि भारताच्या अपेक्षा संपल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी गोलंदाजीचं जबरदस्त प्रदर्शन केलं. ट्रेंट बोल्टने जाडेजाला बाद करुन भारताच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. बोल्टने 2, मॅट हेनरी 3, मिचेल सँटनर 3, तर जेम्स नीशाम आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.
पावसामुळे हा सामना राखीव दिवसाला सुरु करण्यात आला होता. न्यूझीलंडने 50 षटकांमध्ये 239 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात असताना फलंदाजी फ्लॉप ठरली आणि विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं. 2015 च्या विश्वचषकातही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्येच पराभव पत्करावा लागला होता.
संबंधित बातम्या :
शमीचा अनोळखी मुलीला मेसेज, स्क्रीनशॉट व्हायरल