लंडन: आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये 18 धावांनी विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने भारतीय संघाबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विल्यमसनच्या या प्रतिक्रियेतील खिलाडूवृत्तीने अनेक क्रिकेटरसिकांची मनं जिंकली. विल्यमसन म्हणाला, “विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये सुरुवातीला भारतीय संघ अडचणीत आला होता. असं असतानाही इतर खेळाडूंनी शेवटपर्यंत सामन्यात आपलं आव्हान कायम ठेवलं. यामुळेच भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ आहे.”
पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस चाललेल्या विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 3 षटकात केवळ 5 धावांवर आपले 3 आघाडीचे फलंदाज गमावले होते. त्यापुढे 6 फलंदाज गमावत भारताला केवळ 92 धावा करता आल्या होत्या. मात्र, रवींद्र जाडेजाने (77) आणि महेंद्र सिंह धोनीने (50) अशी 116 धावांची भागीदारी केल्याने सामन्यात भारताचे आव्हान कायम राहिले. अखेर या दोघांच्या विकेट पडल्यानंतर भारताचे आव्हानही संपुष्टात आले.
या सामन्यातील विजयानंतर विल्यमसन म्हणाला, “या खेळपट्टीवर 240-250 चे लक्ष्य चांगले राहिल आणि या धावसंख्येवर आम्ही भारतावर दबाव आणू, असा आम्ही विचार केला होता. आमच्या खेळाडूंनी हे यशस्वीपणे करुन दाखवले. नव्या चेंडूला आमच्या गोलंदाजांनी खेळपट्टीवर आणि हवेत स्विंग करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला जागतिक स्तरावरील फलंदाजांवर दबाव आणायचा होता. खेळपट्टी संथ झाल्यानंतर त्याचा आम्हाला फायदा घ्यायचा आहे, हेही आम्ही ठरवले होते. मात्र, भारत जगातील सर्वोत्कृष्ट संघ का आहे हे त्यांनी दाखवून दिले. धोनी आणि जाडेजाने सामना शेवटपर्यंत नेला. त्यांनी हा सामना जिंकला देखील असता.”