हॅमिल्टन : भारतीय फलंदाजांनी कडवी झुंज दिल्यानंतरही हॅमिल्टन टी-20 सामन्यात न्यूझीलंडने चार धावांनी विजय मिळवला. भारताला अखेरच्या षटकात 16 धावांची आवश्यकता होती. पण खेळपट्टीवर असलेल्या दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्या या दोघांना मिळून 11 धावा करता आल्या. ज्यामुळे भारताने ही मालिका 1-2 ने गमावली.
या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 213 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. भारताला शिखर धवनच्या रुपाने 6 धावांवरच पहिला धक्का बसला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजय शंकरने 28 चेंडूत 43 धावा केल्या. पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. विजयनंतर आलेल्या रिषभ पंतने धडाकेबाज सुरुवात केली. पण 12 चेंडूत 28 धावा करुन तो माघारी परतला.
विजय शंकर बाद झाल्यानंतर एकामागोमाग एक जम बसलेले फलंदाज बाद झाले. कर्णधार रोहित शर्माही 38 धावांवर बाद झाला. हार्दिक पंड्याने आल्यानंतर धुलाई सुरु केली. तो 11 चेंडूत 22 धावा करुन बाद झाला. महेंद्र सिंह धोनीकडून अपेक्षा होत्या, पण त्यालाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. धोनी चार चेंडूत दोन धावा करुन माघारी परतला. अखेर दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
कृणाल पंड्याने 13 चेंडूत 26 धावा केल्या, तर दिनेश कार्तिकने 16 चेंडूत 33 धावा केल्या. पण भारताला विजय मिळवून देण्यात दोघेही अपयशी ठरले. अखेरच्या षटकात विजयासाठी भारताला 16 धावांची आवश्यकता होती. पण मोठे फटकार न खेळता आल्याने आवश्यक ती धावसंख्या गाठता आली नाही आणि भारताचा 4 धावांनी पराभव झाला.
विश्वचषकापूर्वी भारताची परदेशातील ही अखेरची मालिका होती. यानंतर आता ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर आयपीएल सुरु होईल. ऑस्ट्रेलियात भारताने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडमध्येही वन डे मालिकेत मोठा विजय मिळवला. पण टी-20 मालिकेत भारताला यश मिळवता आलं नाही.