दिल्ली – यजमान इंग्लंडकडून (England) पहिली कसोटी पाच गडी राखून गमावल्यानंतर न्यूझीलंडचे (New Zealand) संकट अधिक गडद होताना दिसत आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) दुखापतीमुळे इंग्लंडसोबत सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ग्रँडहोमच्या टाचेला दुखापत झाली. 35 वर्षीय ग्रँडहोमला आता दुखापतीतून सावरण्यासाठी 10 ते 12 आठवड्याचा कालावधी लागेल. कॉलिन डी ग्रँडहोमच्या जागी आता अष्टपैलू मिचेल ब्रेसवेलचा उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, मालिकेच्या सुरुवातीला कॉलिनला दुखापत होणे अत्यंत दुर्दैवी आहे. तो आमच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग होता.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून ट्रेंट ब्रिज येथे सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीत पाच गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर, न्यूझीलंड आता आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत काही गुण मिळविण्यासाठी दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंडचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर इंग्लंड आठव्या क्रमांकावर आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयासह इंग्लंडचा संघ 9व्या स्थानावरून 8व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघाला सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरावे लागले. इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी आता 12.5 टक्क्यांवरून 19.23 टक्क्यांवर गेली आहे. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडची विजयाची टक्केवारी 38.89 वरून 33.33 वर आली आहे. याचा फायदा भारतीय संघाला मिळू शकतो.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 75 टक्के विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची विजयाची टक्केवारी 71.43 आहे. भारताचा संघ 58.33 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, श्रीलंकेचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, त्यांची विजयाची टक्केवारी 55.56 आहे.
पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ (52.38) आहे. वेस्ट इंडिज (35.71) सहाव्या आणि बांगलादेश (16.67) नवव्या स्थानावर आहे.