मुंबई : वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. बॉक्सर निकहत झरीननं अंतिम फेरीत वियतनामच्या एनगुयेन थी टॅमला 5-0 ने पराभूत केलं आणि सुवर्ण पदक आपल्या नावे केलं. मेरी कॉमनंतर अशी कामगिरी करणारी निकहत झरीन ही दुसरी बॉक्सिंगपटू आहे. निकहतच्या जबरदस्त कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने देखील गोल्डन गर्लला खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टमुळे निकहत झरीनला आपला निर्णय बदलावा लागला आहे. महिंद्रा कंपनीने निकहत झरीनला एसयुव्ही महिंद्रा थार गिफ्ट दिली आहे.
निकहत झरीन पुरस्काराच्या रकमेतून आपल्यासाठी मर्सिडिज कार खरेदी करणार होती. मात्र आता पवित्र कार्यासाठी या पैशांचा उपयोग करणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन निकहत झरीनला बक्षिसाच्या रकमेत 1 लाख अमेरिकन डॉलरचा (जवळपास 82,36,550 रुपये) धनादेश आणि प्रायोजक महिंद्रा कंपनीकडून थार गाडी मिळाली आहे. निकहत झरीनने 26 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीत 50 किलो वजनी गटात जेतेपद पटकावलं होतं. वियतनामच्या एनगुयेन थी टॅमला 5-0 ने पराभूत करत लाईट फ्लायवेट किताब आपल्या नावे केला होता.
निकहत झरीनला सामन्यानंतर या रकमेचं काय करणार? असा प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिलं की, “मी याबाबत काही विचार केला नाही. मागे मी विचार केला होता की मर्सिडीज खरेदी करेन.पण मला बक्षिसात थार मिळाली आहे. आता मी माझा निर्णय बदलला आहे. आता मी माझ्या आई वडिलांना उमरासाठी पाठवू इच्छिते. मी याबाबत घरच्यांशी बोलेन.” उमरा मक्का आणि मदिना या दोन मुस्लिम पवित्र स्थळांची तीर्थयात्रा आहे.
“माझं पुढचं लक्ष आशियाई खेळ आणि ऑलिम्पिक क्वालिफायर आहे. मला पॅरिक ऑलिम्पिकमध्ये क्वॉलिफाय करेल अशी आशा आहे.”, असंही निकहत झरीनने सांगितलं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने निकहत झरीन थारची चावी सोपवत एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे.
The unstoppable @nikhat_zareen marks a new chapter in India's sporting history. Congratulations to the Mahindra Emerging Boxing Icon. A brand new All-New Thar is a token of our appreciation for her enormous achievement. #ItsHerTime #ExploreTheImpossible @BFI_official pic.twitter.com/oo8eHTNFTS
— Mahindra Automotive (@Mahindra_Auto) March 26, 2023
“निकहत झरीननं भारतीय इतिहासाच्या पानात एक नवा अध्याय लिहिला आहे. महिंद्र इमर्जिंग बॉक्सिंग आयकॉनला शुभेच्छा.एक नवी ऑल न्यू थार तुझ्या उत्तुंग कामगिरीसाठी “, असं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
महिंद्रा अँड महिंद्र कंपनीने नुकतंच थारचं टू व्हील ड्राईव्ह व्हेरियंट लाँच केलं आहे. या गाडीची किंमत 9.99 लाखांपासून सुरु होते. यापूर्वी ही गाडी फोर व्हील डाइव्हसह होती. एसयुव्हीचे 4 बाय 4 व्हेरियंट 2.2 लिटर डिझेल आमि 2.0 लिटर पेट्रोल इंजिनसह येते. दोन्ही मॅन्युअल आणि ऑटोमेटिक आहेत.