मुंबई : मुंबईत मोठ्या उस्ताहात रविवारी 16 व्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 46 हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. मुंबईसह देशभरातून तसेच परदेशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात नितेंद्र सिंह रावतने बाजी मारली. तर परदेशी पुरुष गटात केनियाचा कॉसमस लगाट याने बाजी मारली.
हाफ मॅरेथॉनमध्ये महिला पोलिसांची छाप
हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात पोलीस पथकाने आपली छाप पाडली आहे. महिला गटात प्रथम क्रमांकावर राजस्थान पोलीस दलातील मिनू प्रजापत, दुसरा क्रमांक साई गिता नाईक (मुंबई पोलीस) आणि तिसऱ्या क्रमांक रेल्वेच्या मंजू यादव यांनी पटकावला. तर पुरुष गटात प्रथम क्रमांकावर श्रीणू मुगाता, द्वितीय क्रमांकावर करण थापा तर तिसऱ्या क्रमांकावर कालिदास हिरवे विजयी झाले.
भारतीय पुरुष पूर्ण मॅरेथॉन
पूर्ण मॅरेथॉन भारतीय पुरुष गटात ही या वर्षी प्रथम क्रमांकावर नितेंद्र सिंह रावतने आपले वर्चस्व राखलं तर दुसऱ्या क्रमांकावर टी. गोपी आणि तिसऱ्या क्रमांकावर करण सिंग विजयी झाला आहे.
दिग्गजांची उपस्थिती
मुंबई मॅरेथॉनची सुरुवात मेरी कोमच्या हस्ते झाली. सकाळी पूर्ण मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ मेरी कोमच्या हस्ते करण्यात आला. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपचे अध्यभ आशिष शेलार या सोबतच सिनेकलाकार गुलशन ग्रोव्हर, उद्योगपती अनिल अंबानी-टीना अंबानी यांनीही यावेळी हजेरी लावली होती.