लंडन : ओल्ड ट्रॅफर्ड मैदान हे “No Fly Zone” म्हणून जाहीर करण्यात आलंय. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनल सामना होईपर्यंत या मैदानावरुन एकही विमान जाऊ शकणार नाही. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एका विमानाने मैदानावर घिरट्या घेत भारताविरोधात पोस्टर प्रदर्शित केले होते. यानंतर स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन आयसीसीने हा निर्णय घेतलाय. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयलाही याबाबत माहिती दिली.
आमच्या खेळाडूंच्या सुरक्षेविषयी जो धोका निर्माण झाला होता, त्याबाबत आमचं मत आम्ही आयसीसीला स्पष्ट शब्दात कळवलं होतं. यानंतर एक दिवसासाठी ओल्ड ट्रॅफर्डचा भाग “No Fly Zone” घोषित केल्याची माहिती इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांना कळवली आहे.
शनिवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एका खाजगी विमानाने मैदानावर घिरट्या घेत, भारताच्या विरोधात पोस्टरबाजी केली होती. जम्मू काश्मीरप्रश्नी पोस्टर या विमानातून झळकावण्यात आले होते. हेडिंगलेच्या मैदानातील या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आयसीसीनेही तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करत प्रतिबंधात्मक उपाय करणार असल्याचं सांगितलं होतं.
विश्वचषकात हा प्रकार होण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यावेळी जस्टिस फॉर बलुचिस्तान असे पोस्टर घेऊन जाणारं विमान मैदानावर घिरट्या घेत असल्याचं दिसून आलं होतं. यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये राडाही झाला होता.