मुंबई | भाजप खासदार आणि भारतीय कुस्तीगार परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी म्हणून हे भारताचे सुपुत्र एप्रिल महिन्यापासून नवी दिल्लीतील जंतरमंतर इथे आंदोलनाला बसले आहेत. दिल्ली पोलीस आणि या कुस्तीपटूंमध्ये रविवारी 28 मे रोजी झटापट झाली. पोलिसांनी या कुस्तीपटूंना फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या कुस्तीपटूंना देशातून, विविध क्षेत्रातून आणि क्रीडा क्षेत्रातून समर्थन मिळत आहे.
अनेक खेळाडू हे या कुस्तीपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात तोडगा काढण्यात यावा. कुस्तीपटूंची अशी फरफट होऊ नये, अशा आशयाचं पत्र लिहिलं.
त्यानंतर आता भारताला 1983 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी आपलं पाठिंबा जाहीर केला आहे. कुस्तीपटूंच्या या आंदोलनावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी या माजी वर्ल्ड कप विजेत्या संघाकडून करण्यात आली आहे. या वर्ल्ड कप विनिंग टीमकडून कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत निवेदन जारी केलं आहे.
“आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंना ज्या प्रकारे हाताळलं जातंय वागणूक दिली जातेय, ते पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. कुस्तीपटूंना अथक मेहनत आणि परिश्रमानंतर मेडल्स मिळवली आहेत. ती पदकं कुस्तीपटू गंगेत टाकण्याचा विचार करत आहेत, या विचाराने आम्ही चिंतीत आहोत”, असं या दिग्ग्ज क्रिकेटपटूंनी म्हटलंय.
“कुस्तीपटूंनी जिंकलेली पदकं ही फक्त त्यांचीच नाहीत, तर देशाची आहेत. ती पदकं देशाचा अभिमान आणि आनंद आहे. त्या पदकांसाठी कुस्तीपटूंनी दिवसरात्र, वर्षोंवर्ष मेहनत घेतलीय. अनेक गोष्टींचा त्याग केलाय. तुम्ही पदकांबाबत असा टोकाचा निर्णय घेऊ नये” असं आवाहन या वर्ल्ड कप विनिंग टीमने कुस्तीपटूंना या निवदेनाच्या माध्यमातून केलंय.
1983 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कुस्तीपटूंना पाठिंबा
1983 Cricket World Cup winning team issues statement on wrestlers' protest – "We are distressed and disturbed at the unseemly visuals of our champion wrestlers being manhandled. We are also most concerned that they are thinking of dumping their hard-earned medals into river… pic.twitter.com/9FxeQOKNGj
— ANI (@ANI) June 2, 2023
“कुस्तीपटूंच्या तक्रारी एकून घ्यायला हव्यात. त्या तक्रारी ऐकून समजून घेतल्या जातील अशी आम्हाला आशा आहे . तसेच कुस्तीपटूंच्या तक्रारीचं निराकरण करावं अशी आमची अपेक्षा आहे”, असं नम्र आवाहन या क्रिकेटपटूंनी सरकारला केलंय. आता सरकार या विश्वविजेत्या संघाच्या विनंतीला किती महत्व देतं याकडे भारतीयांचं लक्ष असणार आहे.
कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. भारतात गेल्या वर्षी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. या आंदोलनावरुन परदेशी महिला खेळाडूने आपली भूमिका मांडली होती. त्यावेळेस सचिनने त्या महिला खेळाडूला आमच्या देशांतर्गत मुद्द्यांमध्ये नाक न खुपसू नये अशा शब्दात सुनावलं होतं. मात्र आता सचिन कुस्तीपटूंच्या मुद्द्यावरुन का बोलत नाही? नेटकऱ्यांनी हाच मुद्दा धरुन सचिनला सुनावलं आहे.
बुधवारी 30 मे रोजी सचिनच्या घराबाहेर युवक काँग्रेसने याच मुद्द्यावरुन आंदोलनही केलं होतं. सचिन या विषयावर मूग गिळून गप्प का, असा सवालही युवक काँग्रेसकडून करण्यात आला होता.