ऑलिम्पिक स्पर्धा आली की हॉकी खेळाची चर्चा होते. नाही तर चार वर्षे भारतीय हॉकीबाबत कोणालाही सोयर सुतक नसतं. पण मागच्या दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी करून श्वास जिवंत असल्याचं दाखवून दिलं आहे. 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताने कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक आपल्या नावावर केलं आहे. भारताचं सुवर्ण पदक हुकल्याचं दु:ख सर्वांनाच असेल यात शंका नाही. पण भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकून श्वास सुरु ठेवला आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने मेडल जिंकलं आहे. या विजयात मोलाचा वाटा राहिला तो गोलकीपर पीआर श्रीजेश याचा.. गोलपोस्टसमोर द वॉलसारखा उभा असला की प्रतिस्पर्धी संघांची गोल करण्यासाठी चांगलीच दमछाक व्हायची. याची प्रचिती ऑलिम्पिकच्या प्रत्येक सामन्यात आली आहे. मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेतही श्रीजेशने अशीच कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला होता. यंदाची स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच श्रीजेशने निवृत्ती जाहीर केली होती. द वॉल म्हणून ख्याती असलेल्या श्रीजेशच्या हॉकी कारकिर्दिचा शेवट गोड झाला.
या सामन्यापू्र्वी श्रीजेशने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिलं होतं की, ‘आज भारतासाठी शेवटचा सामना खेळत आहे. माझा प्रत्येक बचाव आणि प्रत्येक डाइव्ह, प्रेक्षकांचा आवाज कायम माझ्या हृदयात घोंघावत राहिल. आभार भारत, माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, माझ्यासोबत उभं राहण्यासाठी..हा शेवट नाही. ही एक आठवणींची सुरुवात आहे.’ श्रीजेशच्या हॉकी कारकिर्दितील ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा होती. टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पीआर श्रीजेशला 2020-2021 मध्ये सर्वोत्कृष्ठ गोलकीपरसाठी एफआयएच प्लेयर ऑफ द इअर पुरस्कार मिळाला होता.
As I stand between the posts for the final time, my heart swells with gratitude and pride. This journey, from a young boy with a dream to the man defending India’s honour, has been nothing short of extraordinary.
Today, I play my last match for India. Every save, every dive,… pic.twitter.com/pMPtLRVfS0
— sreejesh p r (@16Sreejesh) August 8, 2024
दरम्यान, भारताने कांस्य पदकासाठीच्या सामन्यात स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवला. या सामन्याच्या सुरुवातीला स्पेनने 1-0 ने आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातल्या पहिल्या मिनिटाला गोल केला होता. त्यानंतर या सत्राच्या शेवटी भारताने गोल करत बरोबरी साधली. तिसऱ्या सत्रात सरपंच हरमनप्रीत कौर याने गोल केला आणि भारताला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनला कमबॅक करता आलं नाही. पेनल्टी कॉर्नर असो की फ्री स्टोक्स सर्वकाही परतावून लावलं. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने 8 सुवर्ण, 1 रजत आणि 4 कांस्य पदकं मिळवली आहेत.