मुंबई : फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. या खेळात एकमेकांकडे लक्ष देऊन बॉल पास करत अंतिम ध्येयाकडे न्यावा लागतो. खऱ्या अर्थाने हा फुलटबॉलपटूंच्या आयुष्यातील ‘गोल’ असतो. पण मैदानातील लुटूपुटूची भांडणं असो की वरचढ होण्यासाठी सुरु असलेली धडपड.. या पलीकडे खेळ भावनाही जोपासली जाते. त्यामुळे फुटबॉलमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूचा तितकाच आदर केला जातो. फुटबॉलपटूंची मैत्री बरंच काही शिकवून जाते. अशीच काहीशी प्रचिती फुटबॉलपटू ओलिवर कान भारतात आल्यानंतर आली आहे. 15 वर्षानंतर का होईना न विसरता ओलिवर कानने आपल्या मित्राची भेट घेतली आहे. ओलिवर कान याने आयपीएस अधिकारी झुल्फिकार हसन यांची भेट घेतली. या मैत्रीचं फक्त एकच नातं आणि ते म्हणजे फुटबॉल प्रेम..दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रात असून फुटबॉलमुळे मैत्री अधिक घट्ट झाली असंच म्हणावं लागेल.
ओलिवर कान 15 वर्षांपूर्वी कोलकात्याला आला होता. त्यावेळी मोहन बागान विरुद्ध बायर्न म्युनिच यांच्यात सामना होता. क्लबसाठी ओलिवर कान याचा हा शेवटचा सामना होता. त्यावेळी कोलकात्याचे सहआयुक्त झुल्फिकार हसन होते. झुल्फिकार हसन यांच्या पुढाकाराने कोलकाता पोलीस नेबरहुड फुटबॉलची सुरुवात झाली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ओलिवर कान प्रमुख पाहुणा होता. तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती.
ओलिवर आणि झुल्फिकार यांची भेट होऊन 15 वर्षांचा काळ लोटला होता. पण इतकं वर्षे लोटूनही दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. ओलिवर भारत दौऱ्यावर आल्यानंतर त्याने झुल्फिकार हसन यांची आवर्जून भेट घेतली. झुल्फिकार दिल्लीत असल्याची माहिती घेतली आणि त्यांना जाऊन भेटला. झुल्फिकार हसन सध्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे महासंचालक आहेत. 15 वर्षानंतर पुन्हा एकदा मैत्रीला नवी पालवी फुटली असंच म्हणावं लागेल.
झुल्फिकार यांची नियुक्ती मागच्या 15 वर्षांच्या कालावधीत देशाच्या विविध भागात झाली. मग कधी ते काश्मीरमधील दंतेवाडा, तर कधी लालगढमध्ये पोस्टिंगवर होते. पण या काळातही त्यांनी फुटबॉल प्रेम जोपासलं. लालगढमध्ये एका फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं. नवोदित फुटबॉलपटूंना प्रेरणा मिळावी यासाठी बायर्न म्युनिच क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं. दंतेवाड्यात आयोजित केलेल्या स्पर्धेत 700 क्लब सहभागी झाले होते. इतकंच काय तर फुटबॉलपटूंना व्यासपीठ मिळावं म्हणून झुल्फिकार यांनी ला लीगा क्लबमध्येही प्रशिक्षणासाठी व्यवस्था केली.