टीव्ही 9 नेटवर्कच्या माध्यमातून पुन्हा एकदा भविष्याचा वेध घेत तीन मोठ्या उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. जर्मनीच्या बर्लिनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या डीएफबी पोकल अंतिम सामन्यानंतर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमत टीव्ही नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी तीन उपक्रम जाहीर केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, टीव्ही9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT) हा उपक्रम जागतिक स्तरावर आयोजित केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची मिळाली आहे, यात शंका नाही. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याने त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 मध्ये जर्मनीमध्ये होईल. या उपक्रमाची घोषणा करताना एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. “या वर्षी आम्ही जर्मनीपासून सुरू होणाऱ्या टीव्ही9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या आंतरराष्ट्रीय पर्वाचे साक्षीदार होणार आहोत. येथे फक्त मीडिया, मनोरंजन आणि फुटबॉलवर नाही, तर व्यापार, तंत्रज्ञान आणि गुंतवणूकीच्या बाबतीत मजबूत आर्थिक संबंध प्रस्थापित करून दोन्ही राष्ट्रांना जवळ आणणार आहोत”, असं एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सांगितलं.
या उपक्रमातील दुसरा कार्यक्रम म्हणजे इंडियन टायगर्स अँड टायग्रेस हंट.. या उपक्रमाच्या माध्यमातून 14 वर्षाखालील मुला-मुलींसाठी जगातील सर्वात मोठ्या फुटबॉलचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तिसरा उपक्रम टीव्ही9 नेटवर्कच्या क्रीडा रसिकांसाठी आहे. भारतात जर्मन फुटबॉल लोकप्रिय करण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली आहे. फुटबॉल 9 या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून क्रीडा रसिकांना मेजवानी मिळणार आहे. प्रत्येक अपडेट आणि माहिती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या दोन उपक्रमांबाबतही एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी आपलं मत मांडलं.
“भारतात टायगर टायग्रेस हंट हा उपक्रम 14 वर्षांखालील मुला-मुलींसाठी आहे. या माध्यमातून फुटबॉलमधील प्रतिभेचा शोध घेतला जाईल. तर फुटबॉल9 हा आमचा डिजिटल प्लॅटफॉर्म, जर्मनीतील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत लॉन्च करण्याची घोषणा करत आहोत. बर्लिनमधील ऑलिम्पिक स्टेडियमवर डीएफबी पोकल अंतिम सामना हा एक अविश्वसनीय सन्मान आहे आणि खेळाभोवतीच्या आमच्या महत्त्वाकांक्षेच्या आकाराला साजेसा आहे. मला खात्री आहे डीएफबी संघटना भारतात टायगर टायग्रेस हंट उपक्रमात कमालीची भर घालेल. तसेच भारताला सर्वोच्च फुटबॉल राष्ट्रांपैकी एक बनण्यास मदत करेल.” असंही एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी पुढे सांगितलं.
जर्मनीतील या कार्यक्रमात भारताचे राजदूत पार्वथनेनी हरीश देखील उपस्थित होते. तसेच जर्मन फुटबॉल असोसिएशन (DFB) चे अध्यक्ष बर्न्ड न्यूएन्डॉर्फ आणि ऑस्ट्रियातील इंडिया फुटबॉल सेंटरचे संस्थापक गेरहार्ड रिडलही उपस्थित होते. जर्मन फुटबॉल असोसिएशन (DFB)चे अध्यक्ष बर्न्ड न्यूएन्डॉर्फ यांनी सांगितलं की, डीएफबीसाठी भारतातील डीएफबी पोकलला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण मुला-मुलींच्या फुटबॉल प्रतिभेचा शोध घेण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्कशी सहयोग करणे आणि टीव्ही9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडे द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी आमचे सहकार्य वाढवणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
टीव्ही नेटवर्क भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा उपक्रम त्याचच प्रतीक आहेत. भारताचे जर्मनीतील राजदूत पार्वथनेनी हरीश यांनी सांगितलं की, ‘भारत आणि जर्मनी हे आधीच धोरणात्मक भागीदार आहेत. जर्मनी हा भारताचा युरोपमधील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. परंतु जर्मनीतील कुशल कामगारांची कमतरता लक्षात घेता द्विपक्षीय व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रतिभा यांची देवाणघेवाण, विशेषत: भारतातील विद्यार्थी वाढवण्यास मोठा वाव आहे. दोन्ही राष्ट्रांना जवळ आणण्यासाठी टीव्ही 9 नेटवर्क सुरू करत असलेल्या उपक्रमांमुळे मला आनंद झाला आहे.
भारतातील तळागाळातील फुटबॉल प्रतिभेचे संगोपन करून टीव्ही 9 नेटवर्क भारताला एक उत्कृष्ट फुटबॉल राष्ट्र बनण्यास मदत करत आहे. जागतिक स्तरावर प्रदर्शन आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देत नवं भविष्य घडवायचं आहे. भुतिया आणि छेत्रीसारखं पुढच्या पिढीला तयार करण्याचा विडा उचलला आहे. टीव्ही9 नेटवर्क जर्मनी आणि भारताला मैदानावर आणि बाहेरही जवळ आणत आहे.