एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी भारताच्या नावावर, चीनची डिफेन्स भिंत भेदत 1-0 ने मात

| Updated on: Sep 17, 2024 | 5:24 PM

भारत आणि चीन यांच्यात एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अपेक्षेप्रमाणे चीनने भारताला कडवी झुंज दिली. पहिल्या दोन सत्रात भारताचे सर्व हल्ले परतावून लावले होते. पण तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात भारताने कमबॅक केलं आणि विजय मिळवला.

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी भारताच्या नावावर, चीनची डिफेन्स भिंत भेदत 1-0 ने मात
Follow us on

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बलाढ्य भारतीय संघाला चीननं तगडं आव्हान दिलं.  पण चौथ्या सत्रात भारतीय संघाने कमाल केली.  1-0 ने आघाडी घेत पाचव्यांदा जेतेपद मिळवलं. सलग दुसऱ्यांदा भारताने जेतेपद मिळवलं आहे. विशेष म्हणजे भारताने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर पार पडलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत जेतेपद मिळवलं आहे. पहिल्या अर्धा तासातील दोन सत्रात एकही गोल झळकावता आला नाही. चीनचा डिफेंस भेदण भारतीय संघाला खूपच जड गेलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पहिल्या हाफमध्ये भारताचं वर्चस्व दिसलं पण चीनची डिफेंस भिंत एकदम तगडी असल्याचं जाणवलं. भारताकडे या सत्रात 84 टक्के बॉल होता. तर चीनकडे ताब्यात फक्त 16 टक्के बॉल होता. तरी भारतीय संघ गोल करण्यात अपयशी ठरला. चीनला एक पेनल्टी, तर भारताला चार पेनल्टी मिळाल्या होत्या. पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यात यश आलं नाही.

तिसऱ्या सत्रातही 0-0 अशी स्थिती राहिली. भारतीय संघ गोल करण्यासाठी धडपड करत राहिला पण काही यश मिळालं नाही. पण चौथ्या सत्रात भारताने आपल्या अनुभवाची शिदोरी खोलली आणि पहिला गोल मारला. चौथ्या सत्राच्या सहाव्या मिनिटाला जुगराज सिंगने गोल मारला आणि 1-0 ने आघाडी घेतली.

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन 2011 पासून होत आहे. 2011 साली झालेल्या पहिल्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. तसेच पहिल्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर सलग दोन वेळा पाकिस्तानने जेतेपद मिळवलं. 2016 साली भारताने कमबॅक केलं आणि पाकिस्तानचा हिशेब चुकता केला. 2018 मध्ये भारत-पाकिस्तान हे संघ जॉइन्ट विनर राहिले. 2021 मध्ये दक्षिण कोरियाने जापानला पराभूत करत जेतेपद मिळवलं होतं. तर 2023 साली भारताने मलेशियाला पराभूत जेतेपदावर नाव कोरलं होतं.

भारताची चीनविरुद्ध प्लेइंग 11 : कृष्णन पाठक (गोलरक्षक), हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास,सुमित, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजीत सिंग, अराजीतसिंग हुंदाल.