हॉकी टीम इंडियाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. टीम इंडियाने चीन आणि जपानचा धुव्वा उडवल्यानंतर मलेशियाचा धुव्वा उडवला आहे. हॉकी इंडियाने यासह विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. टीम इंडियाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. हॉकी इंडियाने मलेशियाला 8-1 अशा फरकाने लोळवलं. भारताचा हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील मलेशिया विरुद्धचा सर्वात मोठा विजय ठरला. राजकुमार पाल याने भारताकडून सलग 3 गोल केले. तर अरायजित सिंह याने 2 गोल केले. टीम इंडियाने या एकूण 3 विजयासह पॉइंट्स टेबलमधील अव्वलस्थान कायम राखलं आहे. आता भारतासमोर चौथ्या सामन्यात गतविजेत्या दक्षिण कोरियाचं आव्हान असणार आहे. उभयसंघात हा सामना 12 सप्टेंबर रोजी होणार आहे.
राजुकमार पाल याने भारतासाठी सामन्यातील तिसऱ्या मिनिटालाच गोल केला. त्यानतंर हॉकी इंडियाने धडाका असाच सुरु ठेवला. राजकुमारनंतर पुढील तिसऱ्या मिनिटाला (सहाव्या मिनिटाला) अरायजित याने गोल पोस्ट कॉर्नरवरुन गोल केला. यासह भारताने 2-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर जुगराज सिंह याने पेनल्टी कॉर्नरवरुन तिसरा गोल केला. दुसऱ्या सत्रात हरमनप्रीत सिंह याने पहिला आणि एकूण चौथा गोल केला. त्यानंतर राजकुमार पाल याने वैयक्तिक दुसरा आणि एकूण पाचवा गोल केला. यासह दुसऱ्या सत्रातचा शेवट भारताने 5-0 अशा एकतर्फी फरकाने केला.
हॉकी इंडियाचा ऐतिहासिक विजय
Statement victory against Malaysia today here at the Asian Champions Trophy, 2024.
Completely dominating attacking display from the Indian Forward line, midfield and Drag-Flickers.
Hat-trick from Rajkumar Pal, brace from Araijeet Singh Hundal and one goal each from Jugraj… pic.twitter.com/XxEF69Zihn
— Hockey India (@TheHockeyIndia) September 11, 2024
त्यानंतर 33 व्या मिनिटाला राजकुमार पाल याने गोल करण्याची हॅटट्रिक पूर्ण केली. भारताने 6-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर मलेशियाने खातं उघडलं. सामन्यातील 34 व्या मिनिटाला अखिमुल्लाह अनवार याने मलेशियासाठी एकमेव गोल केला. मात्र भारताकडे मोठी आघाडी असल्याने त्याचा काही फरक पडला नाही. त्यानंतर अरायजित सिंह याने 39 व्या मिनिटाला सातवा गोल केला. तर उत्तम सिंह याने 41 व्या मिनिटाला आठवा गोल केला. टीम इंडियाने यासह मलेशिया विरुद्ध सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने याआधी मलेशियाला 2023 साली साखळी फेरीत 5-0 ने पराभूत केलं होतं.