Asian Champions Trophy : हॉकी टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, जपानचा 5-1 ने धुव्वा

| Updated on: Sep 09, 2024 | 4:59 PM

Asian Champions Trophy 2024 India vs Japan Hockey Match Result : हॉकी इंडियाने आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने जपानचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवला आहे.

Asian Champions Trophy : हॉकी टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, जपानचा 5-1 ने धुव्वा
ind vs jap hockey
Image Credit source: Hockey India x Account
Follow us on

हॉकी टीम इंडियाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने चीननंतर आता जपानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने चीनचा 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली होती. त्यानंतर आता जपानला 5-1 अशा फरकाने लोळवलं आहे. टीम इंडिया या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी पोहचली आहे. आता टीम इंडियासमोर तिसऱ्या सामन्यात मलेशियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाचं हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याकडे लक्ष असणार आहे.

टीम इंडियाकडून सुखजीत सिंह याने सर्वाधिक 2 गोल केले. तर अभिषेक, संजय आणि उत्तम सिंह या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 गोल केला. भारताने आक्रमकपणे सामन्याची सुरुवात केली. भारताने सामन्यातील दुसऱ्याच मिनिटाला गोल करत खातं उघडलं. त्यानंतर पुढच्या मिनिटाला अर्थात तिसऱ्या मिनिटाला अभिषेकने गोल केला. टीम इंडियाने यासह पहिल्या क्वार्टरमध्ये 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. टीम इंडियाकडून दुसऱ्या क्वार्टरमध्ये संजयने 17 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला. त्यामुळे टीम इंडियाची आघाडी ही 3-0 अशी झाली.

एका बाजूला टीम इंडियाने सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. तर दुसऱ्या बाजूला जपानला एका गोलसाठी संघर्ष करावा लागत होता. जपानच्या पहिल्या गोलची प्रतिक्षा अखेर तिसऱ्या सत्रात संपली. तिसऱ्या सत्रातील चौथ्या मिनिटाला जपानने पहिला गोल केला. मत्सुमोतो काजुमासा याने गोल करत जपानचं खातं उघडलं. तर भारताला तिसर्‍या सत्रात गोल करण्यात अपयश आलं. मात्र त्यानंतरही टीम इंडिया 3-1 ने आघाडीवर होती.

जपानचा धुव्वा, आता मलेशियाचा नंबर


तिसऱ्या सत्रात गोल न केल्याची सळ मनात होती. त्यानंतर चौथ्या सत्रात सामन्याच्या 54 व्या मिनिटाला उत्तम सिंह याने गोल केला. तर सामना संपता संपता सुखजीत सिंह याने आणखी एक गोल केला. त्यासह टीम इंडियाने 5-1 अशा फरकाने सामना जिंकला.