मुंबई : एशियन गेम्स 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा 7 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या स्पर्धेत भारताच्या 655 खेळाडूंनी भाग घेतला असून 328 महिला आणि 325 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. 15 दिवसात 41 स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही सामने होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने क्रीडाप्रेमींना या सामन्यांची उत्सुकता आहे. आशिया कप 2023 स्पर्धेचं जेतेपद भारताने पटकावलं आहे. तर पाकिस्तानचं आव्हान सुपर 4 फेरीतच संपुष्टात आलं. तर एशियन गेम्समध्ये पुन्हा एकदा सामना येतील अशी शक्यता आहे. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आणि इतर खेळांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि अरशद नदीम पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहे. यामुळे भारत पाकिस्तान हा सामना पाहायला मिळणार आहे. नीरज चोप्रा आणि अरशद नदीम दोघंही सुवर्ण पदकाचे दावेदार आहे. अरशद नदीम याने कॉमनवेल्थ चॅम्पियन होण्यासोबत 90 मीटरपर्यंतच अंतर गाठलं आहे. नीरजने अजून हे अंतर गाठलेलं नाही. हे दोन्ही खेळाडू 4 ऑक्टोबरला आमने सामने असतील.
एशियन गेम्समध्ये यावेळी क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. पुरुष आणि महिला दोन्ही गटात या स्पर्धेत सहभागी आहेत. त्यामुळे उपांत्यपूर्व, उपांत्य किंवा अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
कबड्डी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ कबड्डीत एकदम जबरदस्त आहेत. त्यामुळे काँटे की टक्कर पाहायला मिळेल. पाकिस्तान पुरुष संघ दोन वेळा एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र भारताने दोन्ही वेळेस धोबीपछाड दिला आहे. यावेळी दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळे बाद फेरीत दोन्ही संघ भिडण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी हॉकीच्या मैदानातही आमनेसामने येतील. दोन्ही संघांची हॉकीमधील कामगिरी चांगली राहिली आहे. पण गेल्या काही वर्षात पाकिस्तानच्या हॉकीचा स्तर खालावला आहे. 30 सप्टेंबरला भारत पाकिस्तान दोन्ही संघ भिडणार आहेत.
टेनिस कोर्टवरही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारताकडून रोहन बोपन्ना आणि पाकिस्तानकडून ऐसाम एल कुरैशी खेळणार आहेत. या दोन्ही खेळाडूंमध्ये सामना होण्याची शक्यता आहे. दोन्ही खेळाडू 2010 यूएस ओपम अंतिम फेरीत आमनेसामने आले होते.