ऑलिम्पिकच्या इतिहासात 124 वर्षांपूर्वी खेळली गेली क्रिकेट स्पर्धा, या संघाला मिळालं होत गोल्ड

| Updated on: Jul 27, 2024 | 7:40 PM

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. अजूनतरी भारताच्या पारड्यात पदक पडलेलं नाही. पण एअर पिस्टल प्रकारात मनु भाकरकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे, पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट हा खेळ असणार आहे. पण यापूर्वीही क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये होतं.

ऑलिम्पिकच्या इतिहासात 124 वर्षांपूर्वी खेळली गेली क्रिकेट स्पर्धा, या संघाला मिळालं होत गोल्ड
Image Credit source: संग्रहित
Follow us on

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची रंगत आता हळू हळू वाढू लागली आहे. ऑलिम्पिकमध्ये एकूण 32 खेळ होणार आहेत. यात शूटिंगपासून हॉकीपर्यंत खेळ आहेत. या स्पर्धेसाठी भारताकडून 117 खेळाडूंनी भाग नोंदवला आहे. त्यामुळे भारताच्या वाटेला कधी एकदा पदक येतं याची उत्सुकता आहे. पहिल्या दिवशी भारताची निराशाजनक सुरुवात झाली. पण 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु भाकरने चमकदार कामगिरी केली. तसेच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. असं असताना क्रिकेटप्रेमी भारताला ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट असता तर बरं झालं असं वाटतं. पण यासाठी आणखी चार वर्षे वाट पाहावी लागणार आहे.  2028 ऑलिम्पिक स्पर्धेत टी20 क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. पण यापूर्वी क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये खेळलं गेलं की नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तर त्याचं उत्तर हो असं आहे.

आजपासून 124 वर्षांपूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट या खेळाचा समावेश होता. त्यामुळे पहिलं सुवर्ण पदक कोणी मिळवलं? ते जाणून घेऊयात. ऑलिम्पिक स्पर्धेचं पहिलं पर्व 1896 मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा 1900 साली म्हणजेच चार वर्षांनी पॅरिसमध्ये खेळवली गेली. तेव्हा क्रिकेटचा समावेश केला गेला होता. तेव्हा ब्रिटेनपासून फ्रान्स, नेदरलँड आणि बेल्जियम यांनी आपले संघ स्पर्धेत उतरवण्याची तयारी केली होती. मात्र नेदरलँड आणि बेल्जियम या देशांनी नाराजी व्यक्त केलीहोती. कारण त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपला क्रिकेट संघ पाठवलाच नाही.

जेतेपदासाठी ब्रिटेन आणि फ्रान्समध्ये एकमेव आणि अंतिम सामना खेळवला गेला. हा सामना पॅरिसच्या सायकलिंग स्टेडियम वेलोड्रॉम डी विन्सेन्नेस येथे खेळवला गेला. दोन्ही संघाकडून 12 खेळाडू मैदनात उतरले होते. हा कसोटी सामना होता आणि दोन दिवस चालला. ब्रिटनने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या. तर फ्रान्सचा संघ फक्त 78 धावा करू शकला. त्यानंतर दुसऱ्या डावात ब्रिटनने 5 गडी गमवून 145 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं. विजयी धावांचा पाठलाग करता फ्रान्सचा संघ 26 धावांवर बाद झाला. हा सामना ब्रिटनने 158 धावांनी जिंकला. ब्रिटनने विजय मिळवला आणि सुवर्ण पदक आपल्या पारड्यात टाकलं. हा सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला पाहायला मिळाला. कारण फ्रान्सने यात सुमार कामगिरी केली होती. पण दोनच संघ असल्याने फ्रान्सच्या वाटेला रजत पदक आलं.