D Gukesh : डी गुकेश 64 घरांचा नवा राजा, चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनला ‘चेक मेट’

| Updated on: Dec 12, 2024 | 7:24 PM

D Gukesh Youngest World Chess Champion : डी गुकेश याने इतिहास रचला आहे. डी गुकेश याने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला 'चेक मेट' दिला आहे.

D Gukesh : डी गुकेश 64 घरांचा नवा राजा, चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनला चेक मेट
D Gukesh Youngest World Chess Champion
Follow us on

क्रीडा विश्वातून या क्षणाची मोठी आणि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. भारताच्या डी गुकेश याने इतिहास घडवला आहे. डी गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा किंग ठरला आहे. डी गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट दिला आहे. डी गुकेश यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाअंतिम सामन्यात डिंग लिरेन याच्यावर मात करत ही कामगिरी केली आहे. डी गुकेशने 14 डावांनंतर साडे सात आणि साडे सहा अशा फरकाने पराभव केला आणि वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. डी गुकेशचं या ऐतिहासिक कामगिरीनंतर सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.

सर्वात युवा विश्वविजेता

डी गुकेश याने या विजयासह अनेक विक्रम रचले आहेत. गुकेश वर्ल्ड चॅम्पियन होणारा सर्वात युवा बुद्धीबळपटू ठरला आहे. गुकेशने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. तसेच 12 वर्षांनंतर भारताला नवा चॅम्पियन मिळाला आहे. डी गुकेश याच्याआधी 2012 साली विश्वनाथन आनंद चेस मास्टर ठरले होते.

डी गुकेश याचा अल्प परिचय

वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश हा मुळचा चेन्नईचा आहे. डी गुकेशचे आई आणि वडील दोघेही उच्चशिक्षित आहेत. डी गुकेशची आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. तर वडील डॉक्टर आहेत. मात्र गुकेशला आई-वडीलांपेक्षा वेगळी आवड होती ती म्हणजे चेसची. डी गुकेशने वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून चेस खेळायची सुरुवात केली. गुकेशने त्यानंतर आता अवघ्या 11 वर्षांनी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आणि भारताचं नावं अभिमानाने उंचावलं आहे. डी गुकेशने या दरम्यान अनेकदा उल्लेखनीय कामगिरी केलीय.

जय हो

डी गुकेश याने विश्वनाथन आनंद यांच्या अकादमीतून चेजची बाराखडी गिरवली. आनंद यांनी गुकेशला चेजचे बारकावे शिकवले. गुकेशने वर्ल्ड चॅम्पियन होण्याआधी अनेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. गुकेशने सरावानंतरच्या 5 व्या वर्षी म्हणजेच 12 व्या वर्षी धमाका केला. गुकेश भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला. इतकंच नाही, तर गुकेशने 2023 मध्ये वर्ल्ड रँकिंगमधील पहिलं स्थान पटकावत एक नंबर कामगिरी केली. तसेच अवघ्या काही महिन्यांपूर्वी मार्चमध्ये गुकेशने वर्ल्ड चेस कॅण्डीडेट स्पर्धेत बाजी मारली. गुकेश याने या विजयासह वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलसाठी क्वालिफाय केलं. त्यानंतर आता गुडाकेश भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे.